विशेष बातमी! “AI चा वापर की फसवणुकीचा सापळा?” — गिफ्ट कार्ड स्कॅमने युजर्सची झोप उडवली! सावध व्हा,नाहीतर बँक खाते होईल रिकामे..हुशार लोकही बळी पडले! "अशी" घ्या काळजी..

 
 बुलडाणा (अनंता काशिकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर वाढत असताना आता त्याचाच गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी नवा सापळा रचला आहे. ChatGPT, Google Gemini आणि Claude यांसारख्या लोकप्रिय AI टूल्सच्या नावाखाली गिफ्ट कार्ड स्कॅम जोर धरत असून, यामुळे युजर्सच्या खात्यातून नकळत पैसे वळते होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.

 गिफ्ट कार्ड स्कॅमचा खेळ कसा सुरू होतो?
युजर जेव्हा AI सेवांसाठी क्रेडिट कार्डद्वारे सदस्यता घेतो, तेव्हाच स्कॅमर्स सक्रिय होतात. हॅकर्स युजरच्या खात्यात प्रवेश करून OTP किंवा अतिरिक्त व्हेरिफिकेशनशिवाय एकामागून एक गिफ्ट कार्ड खरेदी करतात. विशेष म्हणजे हे व्यवहार अधिकृत सबस्क्रिप्शनसारखेच दिसतात, त्यामुळे सुरुवातीला ना युजर्सना संशय येतो, ना बँकांना.
 फसवणूक इतकी हुशार व तज्ञही बळी
हा स्कॅम इतक्या चातुर्याने रचला आहे की केवळ सामान्य व्यक्तीच नव्हे, तर तंत्रज्ञान जाणकार लोकही यामध्ये अडकत आहेत. स्कॅमर्स मोठ्या रकमेऐवजी छोट्या-छोट्या व्यवहारांतून पैसे काढतात, त्यामुळे बँकांची फसवणूक शोध यंत्रणा निष्क्रिय राहते.
 ईमेलद्वारे दिशाभूल
अनेक प्रकरणांमध्ये गिफ्ट कार्ड खरेदीचे ईमेल युजरलाच पाठवले जातात. त्यामुळे ते प्रमोशनल ऑफर असल्याचा भास निर्माण होतो. काही दिवसांनी हळूहळू पैसे वजा होऊ लागल्याने युजरला फसवणूक लक्षात येईपर्यंत उशीर झालेला असतो.
 कंपन्यांची भूमिका काय?
AI सेवा देणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या मुख्य पेमेंट सिस्टिममध्ये कोणतीही मोठी सुरक्षा त्रुटी नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे आणि फसवणूक झाल्यास परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, कमकुवत पासवर्ड किंवा ईमेल अकाउंट हॅक झाल्यामुळे हे प्रकार घडत आहेत.
 स्वतःचे संरक्षण कसे कराल?
* नियमितपणे बँक आणि क्रेडिट कार्ड स्टेटमेंट तपासा
* टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) सुरू करा
* ऑनलाइन आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर मर्यादा सेट करा
* संशयास्पद व्यवहार दिसताच त्वरित बँक व सेवा कंपनीशी संपर्क साधा