EXCLUSIVE..! LCB ने अफूच्या शेतीप्रकरणी अंढेऱ्यात केलेली कारवाई वादाच्या भोवऱ्यात! पकडण्यात आलेला मुद्देमाला खरंच साडेबारा कोटींचा की आकडा फुगवला?

 पुणे ग्रामीण LCB चा २००० ते १५००० प्रति किलोचा रेट; अंढेऱ्यात लावला ८० हजाराचा भाव!अट्टाहास कशासाठी?"हा" घ्या पुरावा...! 

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २२ फेब्रुवारीच्या रात्री अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दमदार कारवाई केली. पोलीस स्टेशन पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या संतोष सानप नावाच्या एका शेतकऱ्याच्या शेतातून LCB ने अफू जप्त केली. पकडण्यात आलेला मुद्देमाल १५७२ किलो १०० ग्रॅम असून त्याची किंमत तब्बल १२ कोटी ६० लाख २८ हजार रुपये असल्याचा दावा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून प्रसिद्धीसाठी देण्यात आलेल्या पत्रकात करण्यात आला होता. या भल्या मोठ्या कारवाईमुळे दुसऱ्या दिवशी LCB ची पाठ थोपवणाऱ्या कौतुकाच्या बातम्या प्रकाशित झाल्या. "बुलडाणा लाइव्ह" ने देखील याबद्दलचे वार्तांकन केले होते. LCB च्या या कारवाईमुळे स्थानिक अंढेरा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, त्याची परिणीती एसपी विश्व पानसरे यांच्याकडून ठाणेदार विकास पाटलांच्या बदलीत झाली. दरम्यान आता या कारवाईला ६ दिवस उलटल्यानंतर ही कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. LCB ने केलेल्या कारवाईत मुद्देमालाचा आकडा फुगवण्यात आल्याचा आरोप होतोय.LCB ने जप्त केलेल्या १५७२ किलोच्या मालाला ८० हजार रुपये प्रतिकिलोचा भाव लावण्यात आला. दुसरीकडे याच दिवशी पुणे जिल्ह्यातील इंदापुरात देखील अशीच कारवाई पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात आली, तिथे मात्र जप्त केलेल्या अफूच्या पिकाला झाडासह २ हजार व बोंडांना १५००० रुपये प्रति किलो असा भाव लावण्यात आला. त्यामुळे बुलडाणा LCB ने आकडा फुगवला की पुणे ग्रामीण LCB ने आकडा कमी केला असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे..
धांडे
                    Advt 👆
  बुलडाणा एलसीबी ने अंढेरा येथे कारवाई करून संतोष सानप यांच्या शेतातून झाडासह १५७२ किलो १०० ग्रॅम मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १२ कोटी ६० लाख २८ हजार रुपये असल्याने पोलिसांकडून प्रसिद्धी देण्यात आलेल्या पत्रकात सांगण्यात आले. साहजिकच एवढा मोठा आकडा असल्याने माध्यमांच्या नजरा या कारवाईकडे वळल्या आणि राज्यभराचे लक्ष या बातमीने वेधले. मात्र आता साडेबारा कोटींचा हा आकडा फुगवण्यात आल्याची कुजबूज होऊ लागली आहे. अर्थात या आरोपांत तथ्य असेल तर हा आकडा एवढा फुगवला कशासाठी? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. 
Buldhana
हा घ्या पुरावा...
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने २१ फेब्रुवारी इंदापूर तालुक्यातील न्हावी येथे एका शेतकऱ्याच्या शेतातून अफूचे पीक जप्त केले. वालचंद नगर पोलिस ठाण्यात या प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा एफआयआर "बुलडाणा लाइव्ह" कडे असून त्यात झाडाच्या तोडलेल्या बोंडाचा भाव १५ हजार रुपये प्रतिकिलो तर शेतातील उभे झाडे उपटून त्याचा भाव २ हजार रुपये प्रति किलो एवढा दाखवण्यात आला आहे. अंढेरा येथील कारवाईत LCB ने शेतातील पूर्ण झाडे उपटली, त्याचे वजन १५७२ किलो १०० ग्रॅम भरले. पुणे ग्रामीण LCB ने लावलेल्या दराप्रमाणे झाडासह २ हजार रुपये प्रतिकिलो असा दर लावल्यास अंढेऱ्याचा मुद्देमाल ३१ लाख ४४ हजार एवढ्या रुपयांचा होतो. त्यात वाढ करून १५ हजार रुपये प्रतिकिलो एवढा लावला तरी त्या मुद्देमालाची किंमत २ कोटी २५ लाखांपर्यंत जाते. त्यामुळे १२ कोटी ६० लाख रुपयांपर्यंत हा आकडा का फुगवला? यामागचा हेतू काय? असा सवाल उपस्थित होत आहे. जर बुलडाणा पोलिसांनी आकडा फुगवला नाही तर मग पुणे ग्रामीण पोलिसांनी चुकीचा दर लावला काय? असे विविध प्रश्न या कारवाईच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत..या कारवाईचे श्रेय घेणाऱ्या बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडूनच या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत....