मासेमारीच्या नादात विजेचा धक्का; युवकाचा मृत्यू तोरणा नदीतील घटना; दोघांना अटक !

 
 खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : कंचनपूर शिवारातील तोरणा नदी पात्रात मासेमारी करताना विजेच्या धक्क्याने बोथा काझी येथील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी उशिरा घडली. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
फिर्यादी गोपाल चंद्रभान घटे (२४, रा. बोथा काझी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा भाऊ गुलाब चंद्रभान घटे (२७) हा ३० ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान कंचनपूर शिवारातील तोरणा नदीकाठी मासेमारीसाठी गेला होता. त्याच्यासोबत आरोपी शेख रशीद शफीक व शेख समीर शेख कालु (दोघेही रा. बोथा काझी) उपस्थित होते.
मासे पकडण्यासाठी पाण्यात विजेचा करंट सोडण्यात आला होता. 
या निष्काळजी कृत्यामुळे गुलाब घटे यांना जोरदार विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर नातेवाइकांच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम १०६(१), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही नोंद ३१ ऑगस्ट रोजी पहाटे १२.२० वाजता करण्यात आली.
पोलिस हवालदार गजानन आहेर यांनी प्राथमिक नोंद केली असून, पुढील तपास हवालदार विलास साखरे करीत आहेत. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ग्रामीण भागात विजेच्या साहाय्याने मासेमारीचे प्रकार वाढत असून, अशा निष्काळजी कृत्यांमुळे जीवितहानी होत आहे.