सोन्यासारखे बिस्कीट दाखवून ज्येष्ठ महिलेची फसवणूक; ३२ हजारांचे दागिने लंपास...

 
 देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सोन्यासारखे बिस्कीट दाखवून ज्येष्ठ महिलेची फसवणूक करून तिच्याकडील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना २८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास देऊळगाव मही परिसरात घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी सुमनबाई साहेबराव चेके (वय ६५, रा. सरंबा, ता. देऊळगाव राजा) या दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास देऊळगाव मही येथे असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांच्याशी बोलणे सुरू केले. आरोपींनी फिर्यादीस सोन्यासारखे दिसणारे बिस्कीट दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची पोथ अंदाजे १६ हजार रुपये व कानातील सोन्याची फुले अंदाजे १६ हजार रुपये, असे एकूण ३२ हजार रुपयांचे दागिने चलाखीने घेतले.दागिने घेतल्यानंतर आरोपींनी फिर्यादीस सोन्यासारखे बिस्कीट देत फसवणूक केली आणि घटनास्थळावरून पसार झाले. नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी सुमनबाई चेके यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलीसांनी अज्ञात दोन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार ब्रह्रागिरी यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोहेकॉ कलीम देशमुख करीत आहेत.दरम्यान, अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी, विशेषतः ज्येष्ठांनी, अनोळखी व्यक्तींवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.