किरकोळ वादातून विठ्ठलवाडी शिवारात वृद्धाचा खून; एका तासात डोणगाव पोलिसांनी आरोपीस केले जेरबंद !
Dec 15, 2025, 14:23 IST
डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : येथून जवळ असलेल्या ग्राम विठ्ठलवाडी शिवारात किरकोळ कारणावरून वाद होऊन त्यात एका ७७ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना १४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अवघ्या एका तासात शोधून अटक केली आहे. मखराम चतरु राठोड (रा. विठ्ठलवाडी, वय ७७) असे मृतकाचे नाव आहे तर देविदास चंद्रभान जामकर (रा. सोनोना, ता. पातूर, जि. अकोला, वय ५५) असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी शिवारात मखराम चतरु राठोड हे धरणाच्या ओढ्यालगत असलेल्या शेतात गेले होते. त्यांना पाहण्यासाठी नातू शेतात गेला असता आजोबा पडलेल्या अवस्थेत दिसून आले. याची माहिती तातडीने डोणगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे, पीएसआय पवार, पोकाॅ. पवन गाभणे तसेच चालक चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. वृद्धाच्या डोक्यावर मार लागल्याचे आढळून आल्याने हा घातपात असल्याचा संशय ठाणेदार अमरनाथ नागरे यांना आला. त्यानंतर त्यांनी आपल्या पथकासह परिसरात शोधमोहीम सुरू केली.
दरम्यान, बाजूच्या शेतात असलेला राखणदार देविदास चंद्रभान जामकर हा शेतात नसल्याने संशय अधिक बळावला. ठाणेदार अमरनाथ नागरे व पोकाॅ. पवन गाभणे यांनी परिसरातील शेतांची तपासणी केली असता सदर संशयित देविदास जामकर हा एका शेतात झुडपाआड लपून बसलेला आढळून आला. त्याला संशयित म्हणून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आले.
चौकशीदरम्यान आरोपीने शेतात किरकोळ वाद झाल्यानंतर हाणामारी झाली व त्यामध्ये आपण मृतकाच्या डोक्यावर काठीने वार केल्याने मखराम चतरु राठोड यांचा जागीच मृत्यू झाल्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयाच्या आधारे आरोपीला एका तासात ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर घटना उघडकीस आली. आरोपीस अटक करण्यात आली असून, या घटनेचा उलगडा १५ डिसेंबर रोजी पोलिसांनी रात्रभर तपास करून केला आहे. पुढील तपास ठाणेदार अमरनाथ नागरे करीत आहेत.
