मोटारसायकल काढण्याच्या नादात वृद्धाचा बळी! धोकादायक विहिरीत उतरविल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू; दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा! आसलगाव येथील घटना..

 
 जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आसलगाव येथे निष्काळजीपणाचा कळस गाठणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. विहिरीत पडलेली मोटारसायकल बाहेर काढण्यासाठी तब्बल ७० वर्षीय वृद्धाला धोकादायक विहिरीत उतरविण्यात आले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून जळगाव जामोद पोलिसांनी दोघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशरथ लक्ष्मण श्रीनाथ (वय ७०, रा. आसलगाव) यांना गावातील एका विहिरीत पडलेली मोटारसायकल बाहेर काढण्यासाठी आरोपी योगेश रवींद्र ढोकणे आणि पिंटू तोताराम साटोटे यांनी विहिरीत उतरविले. संबंधित विहीर धोकादायक असल्याची माहिती असतानाही वृद्ध व्यक्तीला खाली पाठविण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.विहिरीत उतरल्यावर दशरथ श्रीनाथ यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मोटारसायकल वाचविण्याच्या प्रयत्नात एका वृद्धाचा जीव गमवावा लागल्याने गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

या प्रकरणी मृत वृद्धाचे पुत्र विष्णू दशरथ श्रीनाथ (वय ३५, व्यवसाय – मासेविक्री, रा. आसलगाव) यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत धोक्याची पूर्ण कल्पना असूनही वृद्धाला विहिरीत उतरवून त्यांच्या जीवाशी खेळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीच्या  आधारे पोलिसांनी आरोपी योगेश ढोकणे व पिंटू साटोटे यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

निष्काळजीपणाची किंमत एका जीवाने चुकवली

केवळ विहिरीत पडलेली मोटारसायकल बाहेर काढण्यासाठी एका वृद्ध व्यक्तीला जीव धोक्यात घालण्यास भाग पाडण्यात आल्याची चर्चा गावात रंगली आहे. सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवून घेतलेल्या या निर्णयामुळे एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला असून या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.