चंदनाची वाहतूक करणारी आयशर पोलिसांच्या जाळ्यात; मलकापूर पोलिसांची कार्यवाही!
Updated: Jul 8, 2025, 12:19 IST
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आयशरद्वारे नेण्यात येणारे पंधरा लाख रुपये किमतीचे आठ क्विंटल चंदन शहर पोलिसांनी पकडले. या प्रकरणी वाहनचालकास अटक करण्यात आली आहे. वाहनासह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.
बुलढाणा रोडवरील वानखेडे पेट्रोलपंपानजीक बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) कडे जाणारे मालवाहू आशयर आले. संशयावरून पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. तपासणी केली असता आयशर गाडीमध्ये अतिरिक्त कप्पा बनवून त्यात सहा क्विंटल २९ किलो दीड फुटांचे चंदन गाभे, दोन क्विंटल चंदन गाभा आणि चुरा असे आठ क्विंटल चंदन किंमत १५ लाख ३० हजार रुपये, आयशर सह २५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहनचालक शेख जैनुद्दीन शेख अजीम (४२) रा.नेकनूर ता.जि. बीड यास ताब्यात घेतले आहे. चंदनाचा माल असल्याने वनविभागाला माहिती देण्यात आली होती.