बावनबीरमध्ये दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीत दगडफेक; ३४ जणांविरुद्ध गुन्हा, १२ आरोपींना अटक; केंद्रीय राज्यमंत्री व सहपालकमंत्र्यांची गावात भेट — शांततेचे आवाहन...

 
 बावनबीर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बावनबीर गावात दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणी ३४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून १२ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव व सह पालकमंत्री ना.संजय सावकारे यांनी गावात भेट देऊन शांतता ठेवण्याचे आवाहन केले.
शनिवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये गुलाल फेकाफेकीवरून वाद निर्माण झाला. स्थानिक बीट जमादाराने परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे रात्री पुन्हा मिरवणुकीदरम्यान दगडफेक होऊन तणाव वाढल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी मंदिरात घेण्यात आलेल्या बैठकीत केला.
ग्रामस्थांनी “गावकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका; आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करा,” अशी मागणी केली.
दरम्यान, फिर्यादी भाष्कर शहादेव इलामे (रा. बावनबीर) यांच्या तक्रारीनुसार आरोपी शेख सलीम शेख मुसा ऊर्फ लादेन, तन्वीर खान जुबेर खान, मुस्तकीम मस्जीद खान, सोहील खान बाबा खान, शेख जहीर भान खान, समीर खान रशीद खान, सुफीयान खान मन्नन खान, सलीम खान हाफीज खान, शेख रिजवान शेख मुनाफ, नजीर शहा वजीर शहा तसेच अन्य २५ ते ३० जणांविरुद्ध गुन्हा क्रमांक २४८/२०२५ अंतर्गत कलम १०९, ११८(१), १२५, १२५(अ), १८९(२)(३)(४), १९०, १९१(२)(३), २९८, ३०० भा. न्या. सं. २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आ. डॉ. संजय कुटे यांनी घटनेनंतर गावात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दगडफेकीनंतर पाचही दुर्गा देवींच्या विसर्जन मिरवणुका थांबविण्यात आल्या होत्या. अखेर रविवारी पहाटे चारच्या सुमारास सर्व देवींचे विसर्जन करण्यात आले.
सध्या गावात दोन पोलीस निरीक्षकांसह ६५ पोलीस कर्मचारी तैनात असून, तणावपूर्ण शांतता आहे. सरपंच गजानन मनसुटे यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे.
शांतता आणि एकोप्याने सण साजरा करण्याचे आवाहन 
संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावात झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव आणि जिल्ह्याचे सहपालकमंत्री ना. संजय सावकारे यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
दोन्ही मंत्र्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, “सण उत्सव शांततेत, एकोप्याने आणि परस्पर सन्मानाने साजरे करा.” तसेच पोलिस प्रशासनाला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे निर्देश दिले.