मलकापूर बसस्थानकात मद्यधुंद इसमाचा धिंगाणा; लोखंडी रॉडने ५ एसटी बसच्या काचा फोडल्या...

 
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मलकापूर शहरातील बसस्थानकात मद्यधुंद अवस्थेतील एका इसमाने लोखंडी रॉडने एसटी बसच्या दर्शनी काचा फोडून सुमारे ८० हजार रुपयांचे शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी पहाटे दीडच्या सुमारास घडली. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी संजय गवई (रा. चिंचोल, ता. मलकापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन विभागात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेले संजय सुखदेव खंडागळे हे मलकापूर बसस्थानकात नाईट राउंड ड्युटीवर होते. बसस्थानकात झोपलेल्या प्रवाशांना बस आल्याने उठवत असताना त्यांना अचानक तोडफोडीचा आवाज ऐकू आला. खांडागळे हे सहकाऱ्यांसह आवाजाच्या दिशेने गेले असता, एक इसम हातात लोखंडी रॉड घेऊन बसस्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसच्या दर्शनी काचा फोडताना दिसला. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने हाताला झटका देऊन तेथून पळ काढला. संबंधित इसम दारूच्या नशेत असल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.

या घटनेत MH40 Y-5830, MH14 BT-4356, MH40 AQ-6172, MH40 AQ-6442 आणि MH40 Y-5695 या पाच एसटी बसच्या दर्शनी काचा फोडण्यात आल्या. प्रत्येक काचेची अंदाजे किंमत १६ हजार रुपये असून, एकूण सुमारे ८० हजार रुपयांचे शासकीय नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादी संजय सुखदेव खंडागळे यांच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा क्र. ६०६/२०२६, कलम ३२४(४) BNS तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल शेले करीत आहेत.