दारूच्या नशेत 112 वर फोन अन् पोलिसांना थेट गावात धावायला लावले! खोटी माहिती देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल...

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आपत्कालीन मदतीसाठी शासनाने सुरू केलेल्या ‘डायल 112’ क्रमांकाचा गैरवापर करणे शेलापूर येथील एका 27 वर्षीय तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. दारूच्या नशेत 112 वर फोन करून पोलिसांना खोटी माहिती देत दिशाभूल केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, प्रमोद पांडुरंग सुरडकर (वय 27, रा. शेलापूर) याच्याविरुद्ध बोरखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, 25 जुलै 2026 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास प्रमोद सुरडकर याने दारूच्या नशेत ‘डायल 112’ या आपत्कालीन क्रमांकावर फोन केला. त्याने पोलिसांना एका कथित घटनेची माहिती दिली. आपत्कालीन कॉल असल्याने पोलिसांनी कोणताही विलंब न करता तत्काळ दखल घेतली.

माहिती मिळताच बोरखेडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार पोहेका दिलीप तडवी (ब.नं. 978) आणि पोका संदीप ढोले (ब.नं. 2499) यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी केलेल्या शहानिशेत संबंधित माहितीमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आले. तपासादरम्यान प्रमोद सुरडकर याने दारूच्या नशेत विनाकारण 112 वर फोन करून पोलिसांना खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली.

112 वर खोटा फोन; आता थेट पोलिस ठाण्यात गुन्हा!

याप्रकरणी बोरखेडी पोलीस ठाण्यात अप. क्र. 385/2026 नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 मधील कलम 85 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 212 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास बोरखेडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सिताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोहेका दिलीप तडवी (ब.नं. 978) करीत आहेत.

112 म्हणजे टाईमपासचा नंबर नाही!

‘डायल 112’ हा नागरिकांच्या तातडीच्या मदतीसाठी असलेला आपत्कालीन क्रमांक आहे. या क्रमांकावरून मिळणाऱ्या प्रत्येक कॉलकडे पोलीस यंत्रणा गांभीर्याने पाहते. मात्र, खोटी अथवा बनावट माहिती देऊन पोलिसांचा वेळ व मनुष्यबळ वाया घालवणाऱ्यांवर आता कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.दारूच्या नशेत केलेला एक फोन थेट गुन्ह्यापर्यंत पोहोचल्याने ‘डायल 112’ चा गैरवापर करणाऱ्यांसाठी हा प्रकार चांगलाच धडा ठरला आहे.