बुलढाणा जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा; गारपीटीने पिके उद्ध्वस्त, शेतकरी चिंतेत...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात गुरुवारी अचानक झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक भागांत वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र समोर आले आहे.
अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतेत असून, शासनाकडे तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. ऐन हंगामात झालेल्या या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लोणार तालुक्यातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने अनेक गावांना अक्षरशः झोडपून काढले. काही ठिकाणी गारपीटही झाली असून, परिसरात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.
अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. एकीकडे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. कांदा, गहू तसेच इतर पिकांना या अवकाळीचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.