सिंदखेडराजाच्या "सपना"च्या नादी लागू नका! सोशल मीडियावर रिक्वेस्ट आली तर घेऊ नका.. इश्काच्या जाळ्यात ओढून सगळ करू देते.. पण जालन्यात ७ जणांचा झालाय गेम! एकाला तर देवाघरी पाठवले..! नेमकं मॅटर काय?

 
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय.. बातमीचे शीर्षक वाचून तुम्हीही चक्रावले असणार.. पण हे खरं आहे..! ती सोशल मीडियावर रिक्वेस्ट टाकते..मुलीची स्वतःहून रिक्वेस्ट आली म्हणून अनेक जण ती स्वीकारतात..मग हाय हॅलो सुरू होतं..ती प्रेम करतेय असं वाटू लागतं..प्रेमासाठी काहीपण म्हणत ती स्वतःहून शारीरिक संबंधासाठीही तयार होते.. पण नंतर मात्र होतो तो करेक्ट कार्यक्रम..! जालन्यात तिने तब्बल ७ जणांना गंडा घातलाय.. एक तर तिला वैतागून देवाघरी गेलाय..! जालना जिल्ह्यातील चंदनझीरा पोलिस ठाण्यात आता तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,तिच्यासह तिच्या आणखी ५ साथीदारांना अटक केली आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यानंतर "हनी ट्रॅप" करणारी ही तरुणी सिंदखेड राजा तालुक्यातील पांगरी उगले येथील राहणारी असून तिचे नाव सपना निकाळजे असे आहे..

 सोशल मीडियाच्या माध्यमातून सुशिक्षित, पैसेवाल्या तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याचे गुपचूप व्हिडिओ काढायचे आणि त्यानंतर त्या व्हिडिओच्या माध्यमातून बदनामीची धमकी देत पैसे उकळायचे असा हा प्रकार आहे. विशेष म्हणजे यासाठी एक टोळीच आहे, या टोळीची प्रमुख असलेल्या सपना निकाळजे हिला पोलिसांनी अटक केली आहे. सपनाने आतापर्यंत ७ जणांना लाखो रुपयांनी लुटल्याचे समोर आले आहे. एकाने तर तिच्या वैतागाने आत्महत्या केली.

 

शिक्षक, इंजिनिअर,नोकरदारांना घातला गंडा..

 

सपना केवळ ९ वा वर्ग शिकलेली असली तरी सोशल मिडियाचे तिला ज्ञान आहे. तिचे माहेर सिंदखेडराजा तालुक्यातील माळ सावरगाव आहे.तिला एक मुलगी देखील आहे,मात्र तिच्या अशा वागण्यामुळे गेल्या ६ वर्षांपासून सपना माहेर आणि सासरात राहत नाही. तिच्या टारगेटवर उच्चशिक्षित आणि पैसेवाले असल्याचे समोर आले आहे. तिने अनेक शिक्षक इंजिनियर आणि नोकरदारांना गंडा घातला. साथीदारांची टोळी तयार करून ती असे सगळे गुन्हे घडवायची.त्याबद्दल प्रत्येक साथीदाराला दहा ते वीस हजारांचे मानधन द्यायची.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील करमाड येथे एक उच्चशिक्षित तिच्या जाळ्यात अडकला होता. तिने त्याच्याकडून लाखो रुपये उकळले, तिची मागणी सुरूच होती. अखेर बदनामीच्या भीतीपोटी त्याने आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सपना विरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली होती.६ महिन्यांपूर्वीच ती कारागृहातून बाहेर आली, मात्र तिची सवय काही मोडली नाही. पुन्हा नव्या टोळ्या करून ती लोकांना जाळ्यात अडकवतच राहिली... अखेर एका तक्रारीवरून पोलिसांनी तीला पुन्हा अटक केली आहे..