ज्वारीचे बिल मंजूर करून देण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी टेकाळेंनी मागितली लाच! २५ हजार रुपये स्विकारताना खासगी इसमास रंगेहाथ अटक; ५० हजार रुपयांची केली हाेती मागणी...!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :हमी भाव केंद्रावर विक्री केलेल्या ज्वारीचे देयक मंजूर करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळेसह एका खासगी इसमास 
अँन्टी करप्शन ब्युरोच्या (ACB) बुलढाणा पथकाने २३ जुलै राेजी रंगेहाथ पकडले. २५ हजार रुपये खासगी इसमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून स्विकारत असताना एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन नंदकिशोर टेकाळे (वय ४०) व देवानंद गंगाराम खंडाळे (वय ६२), सेवानिवृत्त जिल्हा लेखा पर्यवेक्षक, रा. तानाजी नगर, बुलढाणा यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पाेलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
तक्रारदार शेतकऱ्याने ज्वारी हमीभाव केंद्रावर विकली होती. त्याचे बिल मंजूर व्हावे आणि भविष्यात अडचण होऊ नये यासाठी गजानन टेकाळे यांनी ७० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर ५० हजार रुपये निश्चित करण्यात आले, त्यापैकी २५ हजार रुपये पहिल्या हप्त्याद्वारे स्वीकारण्यात येणार होते. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार ACBने २१, २२ व २३ जुलै २०२५ रोजी पडताळणी करून सापळा रचला. २३ जुलै रोजी ही कारवाई करताना, खाजगी इसम देवानंद खंडाळे यांनी गजानन टेकाळे यांच्या वतीने तक्रारदाराकडून पंचासमक्ष २५ हजारांची रक्कम स्वीकारली. त्यावेळी ACBच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाई करणाऱ्या पथकात पोलिस निरीक्षक रमेश पवार, विलास गुंसीगे, कर्मचारी शाम भांगे, प्रविण बैरागी, राजेंद्र क्षीरसागर, जगदीश पवार, रंजीत व्यवहारे, शेळेश सोनवणे, गजानन गाल्डे, स्वाती वाणी व नितीन शेटे यांचा समावेश होता.