लाच प्रकरणातील जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे यांना पहिल्याच दिवशी जामीन मंजूर! पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली!
ॲड. शर्वरी- सावजी तुपकरांचा प्रभावी युक्तिवाद पाहण्यासाठी कोर्टात जमली होती गर्दी! कोर्टात नेमकं काय घडलं? वाचा...
Updated: Jul 24, 2025, 21:08 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे यांच्यासह देवानंद खंडाळे नावाच्या एका खाजगी इसमाला काल ,२३ जुलै रोजी २५ हजार रुपयांच्या लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बुलढाणा शाखेने अटक केली होती. या प्रकारानंतर जिल्हाभर एकच खळबळ उडाली होती. दरम्यान याप्रकरणी आज सरकार पक्षाच्या वतीने दोन दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र ॲड. शर्वरी सावजी -तुपकर यांच्या प्रभावी युक्तीवादामुळे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी गजानन टेकाळे यांना जामीन मंजूर केला. एकाच दिवशी न्यायालयासमोर हजर करून पोलीस कोठडीची मागणी फेटाळणे आणि त्याच दिवशी जामीन मंजूर होण्याचे "अँटी करप्शन" मधील हे दुर्मिळ प्रकरण आहे. ॲड. शर्वरी सावजी -तुपकर यांनी गजानन टेकाळे यांच्या बाजूने केलेला प्रभावी युक्तिवाद ऐकण्यासाठी कोर्टात चांगलीच गर्दी जमली होती...!
काल एसीबीने केलेल्या कारवाईनंतर पुढील तपासासाठी आज पोलिसांनी जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे यांची दोन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. गजानन टेकाळे यांच्या वतीने सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड. शर्वरी सावजी -तुपकर यांनी युक्तिवाद केला. ॲड. शर्वरी सावजी -तुपकर यांनी पोलीस कोठडीच्या मागणीसाठी एसीबीने केलेले सर्व आरोप फेटाळले. लाचेची कोणतीही रक्कम ॲड. तुपकर यांचे पक्षकार गजानन टेकाळे यांच्याकडे सापडली नाही किंबहुना त्यांनी स्विकारली नाही. एसीबीने ही कारवाई करण्यासाठी दोनदा पडताळणी कारवाई केली, त्यामुळे मुद्दामहुन आपल्या पक्षकारास अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा मुद्दा ॲड.शर्वरी तुपकर यांनी उपस्थित केला. याशिवाय अटकेनंतर ॲड.शर्वरी सावजी- तुपकर यांचे पक्षकार टेकाळे यांनी एसीबी कडे केलेल्या तात्काळ लेखी खुलासा मध्ये फिर्यादीच्या ज्वारी च्या बिलाचा व खरेदीचा पुरवठा विभागाशी कोणताही सबंध नाही, असे नमूद केले होते त्यामुळे गजानन टेकाळे यांचेकडे फिर्यादी चे कोणतेही काम प्रलंबित नसल्याने लाचेची मागणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा युक्तीवाद शर्वरी सावजी यांनी केला. या प्रकरणातील तक्रारदार हा शेतकरी नसून व्यापारी असल्याचेही ॲड. तुपकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले..शिवाय तक्रारदार आणि आरोपी क्रमांक दोन असलेला खाजगी इसम हे एकाच गावचे असल्याचेही ॲड. तुपकर यांनी युक्तीवादात सांगितले, त्यामुळे लाच स्वीकारण्याचा आरोप असलेला आरोपी क्रमांक दोन खंडाळे आणि तक्रारदार यांचे काही वेगळे व्यवहार असू शकतात हा मुद्दा देखील ॲड. शर्वरी तुपकर यांनी प्रभावीपणे मांडला. ॲड. शर्वरी सावजी -तुपकर यांनी कायद्याचे दाखले देत केलेला अभ्यासपूर्ण युक्तिवाद ऐकून न्यायालयाने गजानन टेकाळे यांच्या पोलीस कोठडीची मागणी फेटाळली. कुठल्याही अटी शर्ती विना,टेकाळे यांना २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.
दुर्मीळ प्रकरण...
लाचखोरीच्या सर्वच प्रकरणात पोलिसांकडून तपासासाठी नेहमीच पोलीस कोठडीची जोरदार मागणी होते. बहुतांश प्रकरणात पुढील तपासासाठी न्यायालयाकडून ती मान्य देखील करण्यात येते. मात्र टेकाळे प्रकरणात ॲड. शर्वरी सावजी -तुपकर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण युक्तिवाद करून आपल्या पक्षकारास जामीन मिळवून दिला. न्यायालयाच्या आवारात अनेक वकिलांनी ॲड. शर्वरी सावजी -तुपकर यांना भेटून त्यांचे अभिनंदन केले...यावेळी गजानन टेकाळे यांचे नातेवाईक आणि त्यांचा मित्रपरिवार तसेच अनेक अधिकारी कर्मचारी न्यायालयात मोठ्या संख्येने जमा झाले होते.