विकृती..!मुक्या प्राण्यांची कदर नाही आली! कुटारात मिसळले विष; १४ बकऱ्यांचा मृत्यू! नांदुरा तालुक्यातील घटना

 
नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विकृत मनोवृत्तीची माणसे काय करतील याचा नेम नाही..नांदुरा तालुक्यातील एका विकृताने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले आहे..शेतातील धुर्‍यावर असलेल्या कुटारात नराधमाने विष मिसळले. तिथे करण्यासाठी आलेल्या बकऱ्यांनी ते कुटार खाल्ले, त्यामुळे १४ बकऱ्यांचा मृत्यू झाला. नांदुरा तालुक्यातील अहमदपूर शेतशिवारात ही धक्कादायक घटना घडली आहे.

नांदुरा शहरातील वार्ड क्रमांक एक मध्ये राहणाऱ्या इंदुबाई सुनील शिरसाट(३५) या अहमदपूर शेत शिवारात विद्या वाकोडे यांच्यासोबत बकऱ्या 
चारण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी कुणीतरी अज्ञात भामट्याने धुर्‍यावर असलेल्या सोयाबीनच्या कुटारात विषारी औषध टाकले. ते कुटार बकऱ्यांनी खाल्ल्यानंतर बकऱ्या गुंगायला लागल्या व एकापाठोपाठ १४ बकऱ्या मृत्युमुखी पडल्या. याप्रकरणी इंदुबाई शिरसाठ यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या पकारामुळे अज्ञात भामट्याविरुद्ध संतापाचे वातावरण आहे.