पायरीवरून वाद पेटला! जिवे मारण्याची धमकी; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल..

 
 जळगाव जामोद (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : घराच्या पायरीचे बांधकाम सुरू असताना झालेल्या वादातून मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना जळगाव जामोद शहरातील गौतम नगर परिसरात घडली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध जळगाव जामोद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संध्या प्रदीप वानखडे (वय ३५, रा. गौतम नगर, जळगाव जामोद) यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता त्यांच्या घराच्या पायरीचे बांधकाम सुरू असताना हा वाद झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तक्रारीनुसार, संदीप मरोटी वानखडे, वंश संदीप वानखडे, सुजाता संदीप वानखडे (तिघेही रा. गौतम नगर, जळगाव जामोद), अतुल सुरेंद्र सुरडावे, उज्ज्वला सुरेंद्र सुरडावे (दोघेही रा. भंडारज, जि. अकोला) आणि नितल भिसे (रा. वडजी, भेंडी, पिंपळगाव राजा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घराच्या पायरीचे बांधकाम सुरू असताना आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा, तसेच एका साक्षीदाराच्या डोक्यात वीट मारल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याशिवाय जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास जळगाव जामोद पोलिस करीत आहेत.