मोताळ्याचा टाकळी घडेकरमध्ये शेतातील धुरावरून वादाचा भडका; ५७ वर्षीय महिलेला लोटपाट, मुलाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण...

 
 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतातील सामाईक धुरा कोरल्याच्या कारणावरून झालेला वाद चांगलाच पेटला. जाब विचारल्याच्या रागातून ५७ वर्षीय महिलेला घरात जाऊन धक्काबुक्की व लोटपाट करण्यात आली. त्यानंतर आईला लोटपाट का केली, असा जाब विचारणाऱ्या तिच्या मुलाला तिघांनी लाठ्या-काठ्यांनी पाठीवर व पोटावर बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना मोताळा तालुक्यातील टाकळी घडेकर येथे घडली.या प्रकरणी कमल कोंडराम बाम्हदे (वय ५७) यांच्या फिर्यादीवरून धामणगाव बढे पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कमल बाम्हदे आणि सुरेश बाम्हदे यांची शेती एकमेकांना लागून आहे. शेतातील सामाईक धुरा कोरल्याच्या कारणावरून कमल बाम्हदे यांनी सुरेश बाम्हदे यांच्या पत्नी सीमा यांना जाब विचारला. त्यावेळी शिवीगाळ झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.यानंतर या घटनेचा राग मनात धरून ९ व १० सप्टेंबर रोजी सुरेश बाम्हदे आणि जितेंद्र बाम्हदे हे कमल बाम्हदे यांच्या घरी गेले. ‘माझ्या पत्नीला शिवीगाळ का केली?’ असा जाब विचारत त्यांनी कमल बाम्हदे यांच्यासोबत धक्काबुक्की व लोटपाट केल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर कमल बाम्हदे यांचा मुलगा घरी आला. आईने घडलेला प्रकार त्याला सांगितल्यानंतर त्याने ‘माझ्या आईला लोटपाट का केली?’ असा जाब विचारण्यासाठी संबंधितांकडे गेला. त्यावेळी सुरेश बाम्हदे, जितेंद्र बाम्हदे आणि प्रवीण बाम्हदे या तिघांनी मिळून त्याला काठ्यांनी पाठीवर व पोटावर मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.या प्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी सुरेश बाम्हदे, जितेंद्र बाम्हदे, प्रवीण बाम्हदे आणि सीमा सुरेश बाम्हदे (सर्व रा. टाकळी घडेकर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास धामणगाव बढे पोलीस करीत आहेत.