समृद्धीवर डिझेल चोरट्यांचा धुमाकूळ! पोलीस मागे अन् चोरटे पुढे...पुढे जे घडलं ते डेंजर!
Sep 13, 2024, 16:26 IST
देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): समृद्धी महामार्गावर डिझेल चोरीच्या घटना याआधीही उजेडात आल्या आहेत. आज,१३ सप्टेंबरच्या पहाटेही अशीच एक घटना समोर आली. पोलीस डिझेल चोरट्यांचा पाठलाग करीत होते. त्यावेळी डिझेल चोरट्यांची इर्टिगा गाडी मेडीयन गेटला धडकल्याने अपघात झाला. या अपघातानंतर चोरांच्या गाडीचा चालक पोलीसांच्या हाती लागला, उर्वरित चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. या कारमधून पोलिसांनी ३५ लिटर च्या दहा कॅन जप्त केल्या आहेत.
बिबी पोलीस स्टेशन हद्दीत मुंबई कॉरिडॉर वरील चॅनल क्रमांक ३१४ जवळ पहाटे ४ वाजेच्य सुमारास हा प्रकार घडला. छत्रपती संभाजी नगरच्या नियत्रन कक्षातून याबाबत बिबी पोलिसांना कळवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे बिबी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक उज्जैनकर, पोकॉ निवृत्ती सानप, अरुण भुतेकर, संदीप किरके, योगेश शेळके या रात्रगस्तीवर असलेल्या पथकाने सदर इर्टिगा कारचा पाठलाग केला. यावेळी चॅनल क्रमांक ३१४ वर या कारचा अपघात झाला. या कारच्या चालकाला पकडण्यात पोलिसांना यश आले असून उर्वरित चोरटे मात्र पसार झाले.