धाड जवळच्या धामणगावात भोंदू बाबाचा पर्दाफाश! गुप्तधनासाठी जुने घर विकत घेतले; गड्डा खोदला; पायाळू जन्मलेल्या ५ वर्षाच्या चिमुकलीचा देणार होता नरबळी...घरात सापडले तंत्र मंत्राचे पुस्तक...

 
 धाड(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्याला लागून असलेल्या भोकरदन तालुक्यातील वालसा वडाळा येथे ३ मार्च रोजी ज्ञानेश्वर भिका आहेर (३०) यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. भोकरदन पोलिसांना ज्ञानेश्वर आहेर यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली होती. त्यातून आहेर यांच्या आत्महत्येच्या कारणाचा उलगडा झाला होता. बुलडाणा तालुक्यातील धामणगाव धाड येथील येथील भोंदू बाबा गणेश दामोदर लोखंडे यांच्या मानसिक त्रासातून ज्ञानेश्वर आहेर यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे पोलिसांनी गणेश लोखंडे याला ताब्यात घेतले होते. या प्रकरणाच्या चौकशीतून तपासाअंती धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. गणेश लोखंडे याने धामणगाव धाड येथे एक जुने घर विकत घेतले होते. त्या घरात गुप्तधन असल्याची माहिती गणेश लोखंडे याला मिळाली होती. तंत्र मंत्रांच्या साह्याने भोंदू बाबा गणेश लोखंडे घरातील गुप्तधन काढण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यासाठी नरबळी देण्यासाठी त्याने घरात एक गड्डाही खोदला होता..याच खड्ड्यात त्याला ज्ञानेश्वर आहेर यांची ५ वर्षीय चिमुकली इश्वरीची बळी द्यायचा होता..कारण ईश्वरी पायाळू आहे अशी माहिती गणेश लोखंडे याला मिळाली होती..
   भोकरदन पोलिसांनी धामणगाव धाड येथे येऊन "त्या" घरातून विविध साहित्य जप्त केले आहे. याच घरात पोलिसांना गोरख तंत्र नावाचे तंत्र मंत्रांचे पुस्तकही मिळाल्याची माहिती आहे. ३ मार्च रोजी वालसा वडाळा येथील ज्ञानेश्वर आहेर यांनी आत्महत्या केली होती. ज्ञानेश्वर आहेर यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून पोलिसांनी धामणगाव धाड येथील भोंदू बाबा गणेश लोखंडे याला ताब्यात घेतले होते. या प्रकरणाच्या चौकशीत पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे...
असा आहे घटनाक्रम..
  वालसा वडाळा येथील ज्ञानेश्वर आहेर व त्यांची पत्नी धामणगाव धाड येथील श्याम बाबा मंदिरात दर्शनासाठी यायचे. इथेच त्यांची ओळख भोंदू बाबा गणेश लोखंडे याच्यासोबत झाली. गणेश लोखंडे यांनी देखील आहेर यांच्या कुटुंबीयांची संपूर्ण माहिती मिळवली होती. धामणगाव येथील एक जुने घर गणेश लोखंडे यांनी विकत घेतले होते. या घरात गुप्तधन असल्याचे त्याला वाटत होते..
त्यामुळे गुप्तधन काढण्यासाठी तो प्रयत्न करत होता.. घर फोडण्यासाठी त्याने एक इलेक्ट्रिक ब्रेकर देखील विकत घेतले होते. याच घरात त्याने नरबळी देण्यासाठी एक खड्डा ही खोदला होता. नरबळी देण्यासाठी त्याला ज्ञानेश्वर आहेर यांची मुलगी ईश्वरी पाहिजे होती, कारण ईश्वरी ही पायाळू जन्माला आल्याची माहिती भोंदू बाबा गणेशने मिळवली होती. त्यामुळे ईश्वरी ही आपलीच मुलगी आहे ती मला द्या असा तगादा गणेश लोखंडे यांनी आहेर कुटुंबीयांकडे लावला होता. त्यासाठी काही दिवसां आधी एका वकिलामार्फत त्याने आहेर कुटुंबीयांना नोटीसही पाठवली होती..यामुळे आहेर कुटुंब मानसिक तणावात होते. यातूनच ज्ञानेश्वर आहेर यांनी आत्महत्या केली. आहेर यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून गणेश लोखंडे याचे पितळ उघडे पडले.. भोकरदन पोलिसांनी धामणगाव धाड येथील "त्या" घरातून इलेक्ट्रिक ब्रेकर सह विविध साहित्य जप्त केले आहे. त्यात गोरख तंत्र नावाच्या एका तंत्र मंत्राच्या पुस्तकाचा देखील समावेश आहे... या संपूर्ण प्रकारामुळे धाड, धामणगाव धाड व परिसरात एकच खळबळ उडाली आहे..