धाडच्या गावगुंडांची पत्रकार वैभव मोहितेंना ठार मारण्याची धमकी! पत्रकार हल्ला विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल; आरोपी सराईत गुन्हेगार

 
बुलडाणा
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ओठांवर मिसररुडही न फुटलेले काही टवाळखोर 'सुपारी दादा' बणू पाहत आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्य दलाच्या जवानाला मारहाण केल्याची सुपारी वाजविणाऱ्या 'गावगुंडां'नी छत्रपती शिवाजी महाराज चौकात तलवारीने केक कापून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या घटनेला आठ-दहा दिवसांचा अवधी लोटत नाही, तोच मध्यरात्री पत्रकाराच्या घरासमोर जाऊन त्यांना जिवाने ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना २० सप्टेंबरच्या पहाटे १२.४० वाजता दरम्यान धाड (ता. बुलढाणा) येथे घडली. या प्रकरणी धाड पोलिसांनी तीन आरोपींविरुध्द पत्रकार संरक्षण कायद्यासह अन्य विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दिवसेंदिवस दहशत माजविणाऱ्या घटनांन अंजाम देणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी पत्रकारांमधून होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील धाड व परिसरातील राष्ट्रीय सलोखा बिघडवून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर दुसरीकडे काहींच्या डोक्यात 'भाईिगरी'च भुत घुसले आहे.

चमकोगिरीच्या नादात काही टवाळखोरांनी धाडमध्ये नंगानाच चालविला आहे. सोशल माध्यमांवर हातात धारदार शस्त्र असलेली फोटो अपलोड करणे, गाव-खेड्यांच्या लोकांशी विनाकारण वाद करुन मारहाण करणे, सार्वजनिक ठिकाणी धारदार तलावारीने केक कापून दहशत माजविण्यासह कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवू पाहणाऱ्या अनेक घटना घडत असतांनाच नुकतेच शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या अक्षय जिवनलाल बिलंगे, रोशन गणेश शिंदे व शिवप्रसाद संजय गुजर टवाळखोरांनी १९ सप्टेंबरच्या पहाटे १२.४० वाजता दरम्यान, 'पुण्य नगरी'चे उप संपादक वैभव मोहिते यांच्या घरासमोर जाऊन तु घराबाहेर ये असे म्हणत अश्लिल शिविगाळ केली.

मोहिते यांनी घराचा दरवाजा उघडून शिविगाळ का करता, विचारले असता, अक्षय बिलंगे याने 'तु आमच्या विरुध्द पेपरमध्ये बातम्या छापतो का?, तु खुप माजला आहे, तु घराचे बाहेर ये, तुला मारुन टाकतो', असे म्हणून जिवाने मारण्याची धमकी दिली व तेथून निघुन गेल्याची घटना घडली.

या प्रकरणी वैभव मोहिते यांनी धाड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुध्द भारतीय न्याय संहितेचे कलम २९६, ३५१ (१), ३५१ (३), ३ (५) सह महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती हिंसाचार प्रतिबंध कायदा २०१७ चे कलम ४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार नरेंद्र पेंदोर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक परमेश्वर केंद्रे हे करीत आहेत.
'फौजी'स फायटरने मारहाण
धाड पोलीस स्टेशन हद्दितील एका गावातील भारतीय सैन्य दलाचा जवान काही दिवसांपूर्वी गावाकडे सुटीवर आलेला होता. किरकोळ कारणावरुन उपरोक्त आरोपी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर जवानास एकटे पाहून धाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात गाठले. त्याच्यासोबत वाद घालत त्याला लोखंडी फायटर व लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना चौकातील 'सीसीटीव्ही' कॅमेऱ्यात कैद असून पोलिसांत नोंदही असल्याची माहिती आहे.
रस्त्यात अडविले पोलिसांचे वाहन
धाड येथील छत्रपती शवाजी महाराज चौकातून करडीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध उपरोक्त आरोपींनी खुर्च्या टाकुन बैठक मांडली होती. दरम्यान, गस्तीवर असलेल्या पोलिसांचे वाहन सदर ठिकाणी पोहोचले. पोलिसांच्या वाहनाला रस्ता करुन देण्याऐवजी आरोपींनी वाहन बराचवेळ अडवून धरत पोलिसांसोबत हुज्जत घातल्याचीही नोंद पोलिसांत असल्याचे समजते.
आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल
गेल्या पंधरवाड्यात याच आरोपींनी धाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित जमा होत धारदार तलावारीने केक कापून गोंधळ घातल्याची घटना घडली होती. पोलिसांनी वेळीच घटनस्थळी धाव घेऊन तलवार जप्त केली होती. नव्हेतर आरोपींविरुध्द आर्म ॲक्ट नुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे, हे विशेष!