

भाविकांची कार ट्रकवर धडकली, एक ठार! तिघे गंभीर जखमी.. नांदुऱ्याजवळ अपघात!
Jan 29, 2025, 08:45 IST
नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): उज्जैन येथून दर्शन करून परतणाऱ्या भाविक युवकांची कार मुंबई ते नागपूर महामार्गावर नांदुऱ्याजवळ समोरील ट्रकवर मागून आदळली. यात एक ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. २८ जानेवारीच्या पहाटे पाच वाजता ही दुर्घटना घडली.
खामगावातील तीन व शेगावचा एक असे चार मित्र स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक एमएच-१४-एफसी-०२८४) ने उज्जैनला दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून परत येताना नांदुरा तालुक्यातील वडनेरजवळ चालकाचे नियंत्रण सुटून कार समोरील ट्रकला मागून जोरात धडकली. या अपघातात रोशन अनिल ठाकरे (२२, रा. रुक्मिणीनगर, खामगाव) हा युवक जागीच ठार झाला.
तर प्रतीक कैलास अवधूत (शेगाव), अक्षय वसंता कळसकर (२०, सुटाळा) व अमन पुरवार (२२, रा. भाटिया- ले आऊट गोपालनगर) हे तिघे जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच ओम साई फाउंडेशनचे विलास निंबोळकर, किशोर क्षीरसागर, त्यांचे सहकारी, संदीप सातव तसेच नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पाठविले. तिन्ही जखमींना प्राथमिक उपचारानंतर अकोला येथे हलविण्यात आले...