चारचाकीसाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा; विवाहितेला शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास दिल्याचा आरोप, शेगावात सहा जणांविरुद्ध गुन्हा

 
 शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, या मागणीवरून विवाहितेला शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक त्रास दिल्याचा आरोप समोर आला आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी आसमा परविन गुलबहार (सदाम) खान (वय २३, रा. मोहम्मद अली चौक, दगडाळीपुरा, शेगाव) यांनी शेगाव शहर पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा क्र. ५९३/२०२६ दाखल केला असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात शबाना बी. सरदार खान (वय ५२), गुलनाज सरदार खान (वय ३०) आणि इमरान खान सरदार खान (वय २८), तिघेही रा. बरडे प्लॉट, खामगाव; मोहम्मद फयाज मोहम्मद इस्तियाक (वय ४८, रा. मदीना मशीदजवळ, देऊळगाव मही); तसेच अहसानहुद्दीन इब्राहिम मुद्दीन (वय ३८) आणि हिना खानम अहसानहुद्दीन इब्राहिमुद्दीन (वय २६), रा. भेडी बाजार, सुरत, गुजरात यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी माहेरून पैसे आणण्याची मागणी करण्यात आली. ही मागणी पूर्ण न झाल्याने तिला कथितरीत्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला. या त्रासाला कंटाळून तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, बुलढाणा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त पत्र तसेच भरोसा सेल, बुलढाणा यांच्याकडून प्राप्त जबाब आणि संबंधित कागदपत्रांच्या आधारे शेगाव शहर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन गावडे करीत आहेत.