लाकूड वाहतुकीच्या परवानगीसाठी २ हजारांची लाचेची मागणी; बुलढाणा उपवनसंरक्षक कार्यालयातील वन सर्वेक्षकाला अटक...
तक्रारदार सुतारकामाचा व्यवसाय करतात. त्यांनी दोन शेतकऱ्यांकडून सागवानाची झाडे खरेदी केली होती. या लाकडाची वाहतूक करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी त्यांनी जळगाव जामोद वनविभागाकडे अर्ज केला होता. पुढील कार्यवाहीसाठी हा अर्ज बुलढाणा उपवनसंरक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आला.
या कामासाठी तक्रारदाराने वन सर्वेक्षक अनिल वाघ यांची भेट घेतली असता, संबंधित काम करून देण्यासाठी दुसऱ्या कर्मचाऱ्याला देण्याकरिता २ हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी वाघ यांनी केल्याचा आरोप आहे. यानंतर तक्रारदाराने बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.
एसीबीच्या पथकाने जुलै महिन्यात या तक्रारीची पडताळणी केली. त्यावेळी अनिल वाघ यांनी स्वतःसाठी २ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने सांगितले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. मात्र, सापळा कारवाईदरम्यान संशय आल्याने वाघ यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. तरीही लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अप. क्र. ९१८/२०२६, कलम ७, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई बुलढाणा एसीबीचे पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रमेश पवार, पोहकॉ. प्रवीण बैरागी, अमोल झिने, दीपक जाधव, जगदीश पवार, पोकॉ. शैलेश सोनवणे, पंढरी शेळके, रंजित व्यवहारे, रतन गिरी, प्रफुल्ल आमले, चापोहैकां नितीन शेटे आणि चापोकॉ. अर्शद शेख यांच्या पथकाने केली.