सिमेंट रोडच्या भेगांत दडलाय मृत्यू; अज्ञात वाहनाची धडक; १६ वर्षीय युवक ठार, एक जखमी...

 
 डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)  :मुंबई–नागपूर सिमेंट महामार्गावरील मोठ्या प्रमाणात पडलेल्या भेगा आता अक्षरशः मृत्यूचे जाळे ठरत आहेत. रस्त्याला पडलेल्या खोल तड्यांमुळे दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडत आहे.या भेगामुळे १६ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचा मित्र गंभीर जखमी आहे.शेख राहील शेख असलम (वय १६, रा. आंबेडकर चौक, मेहकर)असे मृतक मुलाचे नाव आहे.

२४ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास मेहकर–सुलतानपूर मार्गावरील चिंचोली बोरे फाटा येथे हा अपघात झाला. रस्त्यावरील भेगेत दुचाकी अडकल्याने ती अनियंत्रित झाली आणि मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने तीला जोरदार धडक दिली.

अपघातात शेख राहील शेख असलम  हा जागीच ठार झाला, तर त्याचा मित्र गणेश विजय वानखेडे गंभीर जखमी झाला आहे.
राहील व गणेश हे दोघे एमएच-१२-एजी-२६२९ या दुचाकीने सुलतानपूरहून मेहकरकडे जात होते. चिंचोली बोरे गावाजवळील महामार्गाच्या भेगेमुळे दुचाकी घसरली आणि तेवढ्यात हा भीषण अपघात घडला.
सायंकाळी राहीलवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तो आपल्या आईचा एकुलता एक आधार असल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्राणघातक होत चाललेल्या या सिमेंट रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे, जेणेकरून आणखी निष्पाप जीव या भेगांमध्ये अडकून मृत्यूमुखी पडू नयेत.