खामगावमधल्या चोपडे ले-आऊट येथे दिवसाढवळ्या घरफोडी; रो-हाऊस मधून १.२१ लाखांचा ऐवज लंपास, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल..
Apr 30, 2025, 16:14 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – खामगाव शहरातील घाटपुरी येथील विघ्नहर्ता रो-हाऊस (चोपडे ले-आऊट) भागात भरदिवसा चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील रहिवासी धनराज रामचंद्र भारसाकळे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल १ लाख २१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
ही घटना २९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २.३० वाजेच्या दरम्यान घडली. चोरट्याने घराचा दरवाजा तोडून प्रवेश करत कपाट फोडले आणि त्यातील ९१ हजार रुपये रोख रक्कम आणि अंदाजे ३० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन असा एकूण १ लाख २१ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी धनराज भारसाकळे यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०५ (अ), ३३१ (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास एपीआय मंदार पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.