‘डिजिटल अरेस्ट’चा सायबर सापळा; शेगावातील प्रतिष्ठित नागरिकाला २५ लाखांचा गंडा.

 
 शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सायबर भामट्यांनी शेगावातील एका प्रतिष्ठित नागरिकाची तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांमधील ही मोठी फसवणूक मानली जात असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील आदर्श नगर परिसरातील रहिवासी हेमंतकुमार अनंतराम शुक्ला यांच्याशी १५ ते २८ एप्रिल २०२६ या कालावधीत अज्ञात सायबर गुन्हेगारांनी मोबाइल आणि व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला. आरोपींनी स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत शुक्ला यांना तुमचा मोबाईल क्रमांक दहशतवादी कारवायांसाठी वापरण्यात आला असून, तुमचे बँक खाते मनी लॉन्ड्रिंगमध्ये आढळले आहे, अशी खोटी माहिती दिली.
यानंतर आरोपींनी त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आल्याचे सांगून तासन्तास व्हिडिओ कॉलवर ठेवले. अटक, चौकशी आणि कायदेशीर कारवाईची भीती दाखवत मानसिक दबाव निर्माण करण्यात आला. या भीतीपोटी घाबरलेल्या शुक्ला यांनी आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने तब्बल २५ लाख रुपये जमा केले.
दरम्यान, काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हेमंतकुमार शुक्ला यांनी बुलढाणा सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी ३ मे २०२६ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही सरकारी यंत्रणा फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे ‘डिजिटल अरेस्ट’ करत नाही. अशा प्रकारचे कॉल, धमक्या किंवा पैशांची मागणी झाल्यास तातडीने पोलिस किंवा सायबर हेल्पलाईनशी संपर्क साधावा.