तलवारीने केक कापून दहशत निर्माण करणे भोवले; देऊळगाव राजातील सात युवकांवर गुन्हा, पाच अटकेत....

 
 देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर जमाव जमवून आणि तलवारीसारख्या घातक शस्त्राचा वापर करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी देऊळगाव राजा येथील सात युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यापैकी पाच जणांना अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करण्याची तरुणांमध्ये वाढती क्रेझ धोकादायक स्वरूप धारण करत आहे. रस्त्यावर किंवा चौकात वाढदिवस साजरा करण्याच्या या प्रकारांमुळे गंभीर घटना घडण्याची शक्यता वाढली आहे. अशीच एक घटना देऊळगाव राजा येथे ४ नोव्हेंबरच्या रात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा-जालना रोडवरील मिस्त्री कोटकर पेट्रोल पंपासमोर आरोपी मिलन राजेश नाडे (रा. पिंपळनेर), उमेश सतीश अंभोरे (रा. पिंपळनेर), आयान खान जहीर खान (रा. कबाडपुरा), कार्तिक निंबाजी हिवाळे व शुभम लिंबाजी हिवाळे (दोघे रा. माळीपुरा), चंदू साळवे (रा. पिंपळनेर) व विशाल एकनाथ तिडके (रा. साईनगर, देऊळगाव राजा) या सात जणांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी मेन रोडवर जमाव जमवून तलवारीने केक कापला.
या कृतीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. त्यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे कलम 37(1)(3) महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत आदेश तसेच गृह विभागाच्या आदेशाचे उल्लंघन केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम, पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी व पोलीस उपनिरीक्षक दत्ता नरवाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सातही आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींना लवकरच अटक करून न्यायालयासमोर हजर केले जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनी दिली.
या प्रकरणाचा पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत.