क्राइम..! इनसाइड स्टोरी : सोमठाण्यात तिघांचा खून का झाला? साडेपाच वाजता शेतात नेमकं काय घडलं; मुलाला फोन अन् त्यानंतर रक्तरंजित थरार!

जमीन आणि आईच्या पेन्शनवरून भावांमध्ये धुसफूस? मोटारीच्या वायरवरून पुन्हा वाद; गावकऱ्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला, पण काही वेळातच भाऊ-पुतण्या अन् आईचा मृत्यू...
 
चिखली (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या सोमठाणा येथील तिहेरी हत्याकांडामागे शेतीचा हिस्सा आणि आईच्या पेन्शनवरून सुरू असलेला कौटुंबिक वाद कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. गुरुवारी, ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडलेल्या या रक्तरंजित घटनेत आई, सख्खा भाऊ आणि पुतण्याचा मृत्यू झाला. संशयित आरोपी दीपक फत्तेसिंग सुरडकर हा घटनेनंतर फरार असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. 

या घटनेत सरस्वतीबाई फत्तेसिंग सुरडकर (७०), संजय फत्तेसिंग सुरडकर (५५) आणि रणजीत संजय सुरडकर (२५) यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून, श्वान पथक आणि ठसेतज्ज्ञ पथकानेही घटनास्थळी तपास सुरू केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. 

तीन भाऊ... अन् जमिनीच्या वाटणीवरून धुसफूस!

सुरडकर कुटुंबात संजय फत्तेसिंग सुरडकर मोठा, दीपक फत्तेसिंग सुरडकर मधला आणि अजय फत्तेसिंग सुरडकर लहान असे तीन भाऊ आहेत. त्यांचे वडील फत्तेसिंग सुरडकर हे सैन्यात होते. त्यांचे निधन झाले असून, आई सरस्वतीबाई यांना पतीच्या निधनानंतर पेन्शन मिळत असल्याची माहिती आहे.तिन्ही भाऊ आपापल्या कुटुंबासह वेगवेगळे राहत होते. कुटुंबाच्या नावावर एकत्रितपणे सुमारे ७ ते ८ एकर शेती असल्याची माहिती आहे. त्यातील प्रत्येकी सुमारे दोन एकर जमीन तिन्ही भावांना देण्यात आली होती, तर उर्वरित जमीन सरस्वतीबाई यांच्या नावावर ठेवण्यात आली होती.
मोठा मुलगा संजय स्वतःच्या दोन एकरांसह आईच्या नावावरील दोन एकर जमीनही कसत होता. संजय शेलुद येथे कुटुंबासह राहत होता. आई सोमठाणा येथे स्वतंत्र राहत असली तरी संजय तिची देखभाल करण्यासाठी ये-जा करत असल्याचे सांगितले जाते.
याच पार्श्वभूमीवर आईकडील जमीन आणि पेन्शनचा लाभ संजयलाच अधिक मिळत असल्याची नाराजी दीपकच्या मनात होती, अशी प्राथमिक माहिती पुढे येत आहे. मात्र, या कथित कारणाला अद्याप पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 

लहान भाऊ अजयही खुनाच्या प्रकरणात कारागृहात

या कुटुंबातील लहान भाऊ अजय फत्तेसिंग सुरडकर मागील सुमारे वर्षभरापासून एका खुनाच्या प्रकरणात कारागृहात असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने गावातीलच एका दिव्यांग मुलाला विहिरीत टाकून त्याचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
त्यामुळे आधीच या कुटुंबावर खुनाच्या प्रकरणाचे सावट असताना आता त्याच कुटुंबातील तीन जणांच्या हत्येने सोमठाणा हादरून गेले आहे.

सायंकाळी शेतात वाद... गावकऱ्यांनी मिटवला तंटा!

गुरुवारी सायंकाळी सुमारे साडेपाच वाजता संजय आणि दीपक यांच्यात शेतात वाद झाला. संजयच्या विहिरीतील मोटार जळाल्याचे सांगितले जाते. ती मोटार बाहेर काढताना दीपकच्या मोटारीचे वायर तुटल्याने त्यावरून दोन्ही भावांमध्ये वाद झाला.
वाद वाढल्यानंतर गावातीलच काही मध्यस्थांनी हस्तक्षेप करून दोघांचा वाद त्याच ठिकाणी मिटविल्याची माहिती आहे. त्यानंतर दीपक आपल्या घरी निघून गेला. मात्र, याच वादानंतर काही वेळातच परिस्थितीने भयंकर वळण घेतले.

संजयने मुलाला फोन केला... रणजीत चुलत्याला जाब विचारायला आला?

शेतातील वादाची माहिती संजयने फोन करून त्याचा मुलगा रणजीतला दिल्याची माहिती आहे. त्यानंतर रणजीत शेलुद येथून सोमठाणा येथे आला.
प्राथमिक माहितीनुसार, संजय आणि रणजीत हे दीपकच्या घरासमोर त्याला जाब विचारण्यासाठी गेले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर वाद विकोपाला गेला आणि दीपकने धारदार शस्त्राने संजय व रणजीतवर हल्ला केला असावा.
या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

आईनेही जीव गमावला; त्यानंतर आरोपी फरार

संजय आणि रणजीत यांच्यावर हल्ला केल्यानंतर शेजारीच राहणाऱ्या आई सरस्वतीबाई यांच्यावरही दीपकने हल्ला केल्याचा प्राथमिक संशय आहे. या हल्ल्यात त्यांचाही मृत्यू झाला.
त्यानंतर दीपक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे.

मात्र नेमका हल्ला कोणत्या क्रमाने झाला, आईची हत्या नेमकी कशामुळे झाली आणि घटनेवेळी नेमके काय घडले, याचा अधिकृत उलगडा अद्याप झालेला नाही. तिहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच चिखली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागली आहे.

श्वान पथक आणि फिंगरप्रिंट युनिटने घटनास्थळाची तपासणी केली असून, हत्येच्या घटनेशी संबंधित महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

आता दीपकच्या अटकेकडे सगळ्यांचे लक्ष!

या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे संशयित आरोपी दीपक फत्तेसिंग सुरडकर. तो पोलिसांच्या हाती लागल्यानंतरच या तिहेरी हत्याकांडामागील नेमका घटनाक्रम, हत्येचे कारण आणि हल्ल्यामागील वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.शेतीच्या वाटणीवरून सुरू झालेली कुरबूर, सायंकाळचा शेतातील वाद आणि त्यानंतर अवघ्या काही तासांत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू—या घटनाक्रमाने सोमठाणा हादरले आहे. मात्र, हत्येमागील कारणाबाबत अंतिम निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. पोलिस तपासातूनच या रक्तरंजित हत्याकांडाचे संपूर्ण सत्य समोर येणार आहे.