रेती माफीयांविरुध्द धडक कारवाई; दीड महिन्यात ७१२ ब्रास अवैध रेती जप्त; १०.६८ लाखांचा महसूल जमा; देऊळगाव राजा तहसील प्रशासनाची कारवाई !
ही कारवाई जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल पथकाने संयुक्तरीत्या केली.
खडकपूर्णा जलाशय परिसरात मेहुणाराजा, चिंचखेड, सुलतानपूर, सिनगाव जहाँगीर व खल्याळ गव्हान येथे अवैध रेती उत्खननासाठी जाणारे मार्ग चर खोदून बंद करण्यात आले. अवैध उत्खननासाठी खोदलेले खडडे, तात्पुरते साठे व वापरातील साहित्य JCB व पोकलँडच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले.
खडकपूर्णा धरणाच्या प्रवेशद्वाराजवळ अवैध उत्खनन रोखण्यासाठी दोन मोठी लोखंडी गेट बसविण्यात आली असून आणखी तीन ठिकाणी गेट लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय धरण परिसरातील सहा ठिकाणी CCTV कॅमेरे बसवून सतत देखरेख ठेवली जात आहे.
कारवाईदरम्यान पथकाने 28 नोव्हेंबर रोजी – 1 ट्रॅक्टर, 30 नोव्हेंबर रोजी – 2 टिप्पर, 3 डिसेंबर रोजी – 1 टिप्पर अशी एकूण 4 वाहने जप्त करून पोलिस स्टेशनमध्ये अटकाव केली. याशिवाय 15 ऑगस्ट 2025 रोजी 15 जणांवर गुन्हे दाखल केले. तसेच 17 नोव्हेंबर 2025 रोजी 3 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अवैध उत्खननाचा कोणताही प्रयत्न केल्यास बोटीच्या सहाय्याने त्वरित कारवाई केली जाईल, असे तहसील कार्यालयाने स्पष्ट केले आहे. रेती वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष गस्ती पथक स्थापन करण्यात आले आहे.ही सर्व कारवाई तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार सायली जाधव, मंडळ अधिकारी विजय हिरवे, ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली.
