भारताच्या विजयाच्या जल्लोषात वाद; घारोड येथे दोन गट भिडले; फटाके फोडण्यावरून दोन गटांत हाणामारी; परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल...
Mar 10, 2026, 13:45 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :भारत-न्यूझीलंड अंतिम क्रिकेट सामना पाहताना भारताच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी फटाके फोडल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना घारोड येथे घडली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल झाल्याने हिवरखेड पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, घारोड येथील रहिवासी रामकृष्ण महादेव दुतोंडे (वय ४०) यांनी ८ मार्च रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता घरासमोर मोबाईलवर भारत-न्यूझीलंड अंतिम सामना पाहिला. भारत जिंकल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त करत फटाके फोडले. यावरून झालेल्या वादातून अल्ताफ शहा रफिक शहा, तौसिफ शहा रफिक शहा, आसिफ शहा रजाक शहा व रफिक शहा गुलाब शहा यांनी अंगावर धावून येत लोखंडी कुऱ्हाडीने डोक्यावर वार करून जखमी केल्याचा आरोप दुतोंडे यांनी तक्रारीत केला आहे.
या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), १३१, ३५२, ३५१ (२) (३) व ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, दुसऱ्या बाजूने तौसिफ शहा रफिक शहा (वय २५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे त्यांच्या लहान मुलीला त्रास होत असल्याने फटाके फोडू नका असे सांगितल्यावरून वाद निर्माण झाला. त्यावेळी गोपाल वसंता दुतोंडे, गणेश वसंता दुतोंडे, एकनाथ दुतोंडे व रामकृष्ण महादेव दुतोंडे यांनी लोखंडी पट्ट्याने मारहाण करून शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.