

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी नकली उत्पनाचा दाखला तयार करण्याचा डाव! तहसीलदारांनी बरोबर ओळखल; खामगावात तिघांवर गुन्हा दाखल; फोटो स्टुडिओला ठोकले टाळे...
Feb 3, 2025, 08:41 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेच्या नावे बनावट उत्पन्नाचा दाखला तयार करण्याचा प्रयत्न खामगाव तहसीलच्या प्रसंगावधानामुळे फसला. १ फेब्रुवारी रोजी नायब तहसीलदारांनी पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली, त्यावरून दलालांसह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, विजय काशीराम चोपडे या दलालाने पिंपळगाव राजा येथील नौशाद बी तजहीर उल्ला खा या महिलेस संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्याने महिलेचे आधार कार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक आणि झेरॉक्स घेतले आणि २०२४ ऑक्टोबरमध्ये वाडी येथील एका ई-महा सेवा केंद्रावर ऑनलाइन अर्ज केला. मात्र, या अर्जाची पडताळणी करताना, उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये संशय निर्माण झाला. तपासणीदरम्यान, हे उत्पन्न दाखले २० डिसेंबर २०२१ रोजी देवकाबाई मनोहर बोदडे यांच्या नावाने काढलेले होते.
या दाखल्याचा वापर करून पिंपळगाव राजा येथील एका फोटो स्टुडिओमध्ये परमेश्वर रामदास वानखडे यांच्या मदतीने बनावट दाखला तयार करण्यात आला. तपासणीत आक्षेपार्ह कागदपत्रे आणि बनावट शिक्के जप्त करण्यात आले आहेत, तसेच फोटो स्टुडिओला सील ठोकण्यात आले आहे. याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलिसांनी विजय काशीराम चोपडे, परमेश्वर रामदास वानखडे आणि नौशाद बी या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.