बनावट कीटकनाशक प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी – डॉ. गोपाल बच्छीरे

 
लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : लोणार शहरातील बनावट कीटकनाशक विक्री प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित विक्रेते व बनावट कीटकनाशक तयार करणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बच्छीरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी तहसीलदार लोणार यांच्यामार्फत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, लोणार शहरात काही स्थानिक विक्रेत्यांकडून नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट तसेच महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या कीटकनाशकांची खुलेआम विक्री होत असल्याचे समोर आले आहे. विशेषतः ‘Syngenta’ कंपनीच्या नावाने ‘Isabion’ या बनावट उत्पादनाची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याची माहिती पुढे आली आहे. नाशिक येथील कंपनीने पोलिसांच्या मदतीने सापळा रचून लोणारमधील एका विक्रेत्याकडून सुमारे २९ हजार रुपयांचा बनावट मुद्देमाल जप्त केल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

बनावट कीटकनाशकांमुळे पिकांवरील किडीचे नियंत्रण न होता उलट पिकांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक नुकसान वाढत असल्याची बाबही त्यांनी मांडली आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच लोणार व परिसरातील कृषी सेवा केंद्रांची कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून आकस्मिक तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे प्रकरण कोणत्याही दबावाखाली दडपले जाणार नाही, याची शासनाने दखल घ्यावी आणि बळीराजाला लुटणाऱ्या माफियांवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असेही डॉ. बच्छीरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

यावेळी शहर प्रमुख गजानन जाधव, तालुका निवडणूक समन्वयक सुदन अंभोरे, शहर संघटक तानाजी मापारी, युवा शहर प्रमुख श्रीकांत मदनकर, इकबाल कुरेशी, अवेस कुरेशी, अशफाक खान यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.