सिंदखेडराजा शहरातील 'क्लासिक बार' डिझेल टाकून दिला पेटवून; एका विरुद्ध गुन्हा दाखल...
Oct 29, 2025, 19:08 IST
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील क्लासिक बारला अज्ञात व्यक्तीने डिझेल टाकून पेटवून दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या आगीत ७२ हजार ५०० रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी विजय रामभाऊ चौधरी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बार मालक हरिशंकर चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबर रोजी पहाटे अंदाजे ३.०० वाजण्याच्या सुमारास त्यांचे शेजारी सुनील गंगाधर शिलवंत यांनी त्यांना फोन करून बारला आग लागल्याचे आणि बारमधून धूर येत असल्याचे सांगितले.
माहिती मिळताच हरिशंकर चौधरी यांनी तात्काळ त्यांचा मुलगा स्वप्निल व कामावरील मुलगा आकाश यांना घेऊन बारवर धाव घेतली. बारला आग लागल्याचे पाहून आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने त्यांनी आग विझवली. याच वेळी विजय सातपुते यांना आरोपी विजय रामभाऊ चौधरी याने (अंदाजे ३ वाजून १५ मिनिटांनी) फोन करून 'मी तुझ्या मामाच्या बारला आग लावली आहे' असे सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
विजय सातपुते यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता, बारच्या वरील बाजूस असलेल्या टिनपत्राला छिद्र पाडून त्यामधून डिझेल टाकून बारला आग लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. या आगीमध्ये क्लासिक बारचे छत काउंटर, खुर्ध्या तसेच इतर ७२,५०० रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाले आहे. गंभीर स्वरूप असलेल्या या गुन्ह्याच्या तक्रारीवरून, सिंदखेड राजा पोलीस स्टेशनमध्ये विजय रामभाऊ चौधरी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३२६ (आगीने किंवा ज्वलनशील पदार्थाने नुकसान करणे) अंतर्गत गुन्हा (FIR No. 0217/2025) दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक आशिष इंगळे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पंचनामा करतेवेळी पोहेका सानप, पोलीस कर्मचारी विकास राऊत आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.या प्रकरणी
पुढील तपास ठाणेदार आशिष इंगळे हे स्वतः करत असून, आरोपी विजय रामभाऊ चौधरी याचा शोध पोलीस घेत आहेत.
