बँकेच्या नावाने पीडीएफ पाठवून नागरिकांचे व्हॉट्सअॅप हॅक; बनावट लिंकपासून सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन..!
Sep 1, 2025, 13:45 IST
धामणगाव बढे (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :सध्या ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार झपाट्याने वाढत असून, हॅकर्सनी आता एक नवी शक्कल लढवली आहे. भारतीय स्टेट बँक (एसबीआय) च्या नावाने बनावट पीडीएफ रिवार्ड फाइल पाठवून नागरिकांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केले जात आहे. ही घटना धामणगाव बढे परिसरात मोठ्या प्रमाणावर घडत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे धामणगाव पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हॅकर्स व्हॉट्सअॅपवर एक मेसेज पाठवतात, ज्यामध्ये एसबीआयच्या नावाशी साधर्म्य असलेली पीडीएफ रिवार्ड फाइल असते. कोणीही व्यक्ती उत्सुकतेपोटी किंवा ती बँकेची फाइल असल्याचा समज करून उघडल्यास, त्याचे व्हॉट्सअॅप अकाउंट त्वरित हॅक होते. एकदा अकाउंट हॅक झाल्यावर, तीच बनावट लिंक हॅक झालेल्या व्यक्तीच्या फोनमधील सर्व कॉन्टॅक्ट्सना आपोआप फॉरवर्ड होते. त्यामुळे फसवणुकीची ही साखळी झपाट्याने पसरत आहे.या प्रकरणाची गंभीर दखल घेत धामणगाव बढे पोलिस ठाण्याचे ठाणेदार नागेश जायले यांनी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
व्हॉट्सअॅप हॅक झाल्यास काय कराल?
फोन हॅक झाल्याचे लक्षात आल्यास सर्वप्रथम इंटरनेट कनेक्शन बंद करा, सर्व बँक अकाउंट्स आणि ऑनलाइन वॉलेट्स तपासा. संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित तक्रार करा, व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करा, सर्व ग्रुप्स आणि मित्रांना हॅकिंगबाबत माहिती द्या जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करा.
कोणत्याही बँक, सरकारी विभाग किंवा कंपनीच्या नावाने आलेले संशयास्पद मेसेज किंवा लिंक त्वरित डिलीट करा. बँकेशी संबंधित माहिती हवी असल्यास, थेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा शाखेशी संपर्क साधा.
नागरिकांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये, यासाठी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.
– नागेश जायले, ठाणेदार, धामणगाव बढे