गुरांची निर्दयतेने वाहतुक करणे भाेवले; आयशर केले जप्त; एक गाय मृतावस्थेत आढळली; डाेणगाव पाेलिसांची कारवाई ..!

 
डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गुरांची निर्दयीपणे वाहतुक करीत असलेला आयशर ट्रक डाेणगाव पाेलिसांनी जप्त केला. या वाहनात १५ जनावरे काेंबून भरलेली आढळली. त्यापैकी एक गाय मृत अवस्थेत मिळून आली. ही घटना ९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
 
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी शाळेसमोर उभे असताना स्थानिक नागरिक कृष्णा रमेश बकाल यांना एमएच-१९-सीवाय-७९३१ क्रमांकाच्या आयशर ट्रकमध्ये १५ जनावरे कोंबून क्रूर पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ डोणगाव पोलिस ठाण्याला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, एकूण ५,४५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यात अंदाजे १,४५,००० रुपयांची जनावरे आणि ४,००,००० रुपयांचे आयशर वाहन समाविष्ट आहे. गाडीत असलेल्या जनावरांमध्ये एक लाल रंगाची, शिंगे असलेली गाय मृत अवस्थेत आढळली.
या प्रकरणी कृष्णा बकाल यांच्या तक्रारीवरून आरोपी विजय भागचंद मान (वय ४५, रा. मालेगाव जातपांडे, जि. नाशिक) आणि हजु बबजु चव्हाण (वय २५, रा. ज्योती नगर, धानोरी, ता. पुसद, जि. यवतमाळ) यांच्या विरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० कलम ११(१)(ड), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ कलम ५(ब) तसेच भारतीय दंड संहिता कलम ३२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार मंगेश खडसे करीत आहेत.