सुंदरखेड परिसरात धाडसी जनावरांची चोरी; गोठ्याचे कुलूप तोडून २.६० लाखांची पाच जनावरे लंपास...
Updated: Jan 12, 2026, 13:23 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील सुंदरखेड माऊली पार्क परिसरात अज्ञात चोरट्यांनी जनावरांची मोठी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या सुमारास गोठ्याचे लोखंडी कुलूप तोडून पाच जनावरे चोरून नेण्यात आली असून या प्रकारामुळे परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
याप्रकरणी जानेश्वर विजयसिंग राजपूत (वय ३५, रा. सुंदरखेड) यांनी शुक्रवार ९ जानेवारी रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार पशुपालन व्यवसाय करतात. त्यांच्या जुनागाव–सुंदरखेड येथील टीनपत्राच्या गोठ्यात चार म्हशी, दोन वगारी, म्हशीची पिल्ले तसेच गायी व वासरे बांधलेली होती.
बुधवार ७ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तक्रारदाराचा भाऊ विठ्ठल राजपूत याने सर्व जनावरे गोठ्यात बांधून लोखंडी गेटला कुलूप लावले होते. त्यानंतर रात्री साडेदहा वाजता गोठ्याची पाहणी केली असता सर्व काही सुरळीत होते. मात्र ८ जानेवारी रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास गोठ्यावर गेल्यावर दोन दुधाळ म्हशी, एक गाभण म्हैस व दोन वगारी अशी एकूण २ लाख ६० हजार रुपये किमतीची पाच जनावरे चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. गोठ्याचे कुलूप तोडलेले आढळून आले.
दरम्यान, रात्री १.५१ वाजता व २.४२ वाजता पांढऱ्या रंगाची, काळ्या पट्ट्याची बोलेरो पिकअप गोठ्याजवळ येताना व जाताना शेजारील घरांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे काम बुलढाणा शहर पोलिसांकडून सुरू असून वरिष्ठांच्या आदेशान्वये पुढील तपास सुरू आहे.
