पेट्रोल पंपावरून लाखभराची रोकड लंपास... पण पोलिसांच्या जाळ्यात असा अडकला आरोपी; चोरीची संपूर्ण रक्कमही जप्त! धाडच्या पेट्रोल पंपावरून गायब झाली होती कॅश...
म्हसला बु. येथील खंडू संतोषराव भोंडे (वय ३७) यांच्या मालकीचा करडी फाट्यावर पेट्रोल पंप आहे. १५ जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्याने पेट्रोल पंपातील १ लाख ५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी खंडू भोंडे यांच्या तक्रारीवरून धाड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास धाड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या स्वतंत्र पथकाकडून सुरू होता. तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने संशयिताचा माग काढला.
पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार शरद गिरी, जगदेव टेकाळे, पुरुषोत्तम आघाव आणि युवराज राठोड यांच्या पथकाने मौंढाळा येथे सापळा रचून संशयित स्वप्नील मुदाराम वाघमारे (वय १९) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने पेट्रोल पंपावरील चोरीची कबुली दिली.
यानंतर आरोपीच्या ताब्यातून चोरीला गेलेली संपूर्ण १ लाख ५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला धाड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.अवघ्या काही दिवसांत चोरीचा उलगडा करून संपूर्ण रोकड हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आल्याने पोलिसांच्या तपासाचे कौतुक होत आहे.