

पेट्रोल पंपाजवळ पेटली धावती कार; पिकअप आयशरला धडकले! समृद्धी महामार्गावर एकाच रात्री दोन अपघात
Sep 12, 2024, 08:22 IST
दुसरबीड(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): समृद्धी महामार्गावर ११ सप्टेंबरच्या पहाटे १.२० ते साडेतीन वाजेच्या सुमारास दोन तासांच्या फरकाने दोन अपघात घडले. टोलनाक्यापासून जवळच मांडवा गावसीमेवर पेट्रोल पंपाजवळ कारने पेट घेतला. 'द बर्निंग कार'चा थरार झाला, मात्र चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत वाहन उभे केल्याने तिघांचे प्राण वाचले. तर दुसऱ्या अपघातात चॅनल क्रमांक ३३३ वर डुलकी लागल्याने पिकअप आयशरला मागून धडकले. या अपघातातदेखील जीवितहानी टळली.
मांडवा गावानजीक पेट्रोल पंपाजवळ अमरावतीवरून मुंबईच्या दिशेने जाणारी कार (क्रमांक एमएच-०४-एचयू १०७६) कार गरम होऊन पेटली. वाहनचालक जयंत विठ्ठलराव बंदिवान (३७) यांनी समय सुचकतेने कार बाजूला घेऊन पूर्वी रितेश जयस्वाल (२१) व रोहित राजेंद्र सरिया (२४) दोघे राहणार अमरावती यांना सुरक्षित खाली उतरविले. नंतर चालकाने समृद्धी महामार्गाच्या कंट्रोलरूमला फोनद्वारे माहिती दिली. महामार्ग पोलीस उपनिरीक्षक गजानन उज्जैनकर, पोहेकॉ उदय गीते, विजय आंधळे व महाराष्ट्र सुरक्षा बलचे अमोल जाधव, सचिन सनान्से घटनास्थळी पोहोचले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी बंद करण्यात आली होती. क्यूआरव्ही टीमने पेट घेतलेल्या कारवर पाणी मारून आग विझवली. मात्र ही कार आधीच जळून खाक झाली होती. बॅगमध्ये भरलेले सामान व महत्त्वाची कागदपत्रे व घरगुती साहित्य भस्मसात झाले.
दुसरा अपघात समृद्धी महामार्ग चॅनल क्रमांक ३३३ जवळ नागपूर कॉरिडोरनजीक ११ सप्टेंबरच्या पहाटे सव्वा वाजता घडला. या ठिकाणाहून जात असलेल्या पिकअप वाहना (क्रमांक एमएच-१७- बीवाय-२८७०) चा चालक वैभव माळी (२४) याला डुलकी लागली. त्यामुळे हे वाहन समोरील आयशर (क्रमांक एमएच-३५-एजी-३०८३) ला पाठीमागून धडकेले. या अपघातात कुणालाही इजा झाली नाही. घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलीस व एमएसएफ जवान दाखल झाले. त्यांच्या मदतीने क्षतिग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. किरकोळ जखमींवर डॉ. वैभव बोराडे व चालक दिगंबर शिंदे यांनी प्रथमोपचार केला.