देऊळगाव राजा येथे कारचा भीषण अपघात; एक ठार, तिघे गंभीर जखमी...

 
 देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पुलाच्या कठड्यावर कार आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. ४ नोव्हेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास देऊळगाव राजा–सिंदखेड राजा रोडवरील जांभोरा गावाजवळ घडली.अर्जुन सुनीलसिह ठाकूर (वय २५, रा.खामगाव) असे मृतकाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, अर्जुनसिंग सुनीलसिंग ठाकूर  हे आपल्या तीन साथीदारांसह खामगावहून नाशिककडे जात होते. त्यांची एमएच १५ केके ०३४२ ही कार देऊळगाव राजा मार्गे सिंदखेडराजा जवळील समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी निघाली होती. मात्र, जांभोरा गावाजवळ कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार नदीवरील पुलाच्या कठड्यावर जोरात आदळली.
या अपघातात अर्जुनसिंग ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला, तर विजय ठाकूर, धीरज राठी आणि (खंडागळे – पूर्ण नाव ज्ञात नाही) हे तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ जालना येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


घटनेच्या वेळी पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम या सिंदखेडराजा येथून जात असताना त्यांच्या लक्षात अपघात आला. त्यांनी तत्काळ देऊळगाव राजा पोलीस ठाण्याला माहिती दिली. काही क्षणांतच पोलीस उपनिरीक्षक कांचन जारवाल, वाहतूक पोलीस विनोद चव्हाण आणि चालक संतोष मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कारमधून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मर्ग दाखल करण्यात आला असून, घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कांचन जारवाल करीत आहेत.