नागापूरमध्ये घरफोडी; पाच हजारांची रोकड व सोन्याची पोथ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल...
Feb 24, 2026, 20:41 IST
डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागापूर येथे घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी पाच हजार रुपये नगदीसह सोन्याची पोत लंपास केली आहे. ही घटना २२ फेब्रुवारीच्या रात्री घडली असून २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी चोरीचा प्रकार समोर आला.
नागापूर येथील आयडिया टॉवरजवळील गल्लीत संतोष गणपती खनपटे यांचे घर आहे. सध्या शेतातील पीक काढणीचा हंगाम सुरू असल्याने ते शेतात वास्तव्यास गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
घरातील अलमारी फोडून त्यातील सुमारे नऊ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत आणि पाच हजार रुपये नगदी असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. २३ फेब्रुवारी रोजी संतोष खनपटे घरी परतल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत दिसल्याने चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
घटनेची माहिती तत्काळ डोणगाव पोलीस ठाण्यास देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. परिसरात वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.