खामगाव शहरात घरफोडी;बंद घराचे कुलूप तोडून २ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास...

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील सिंधी कॉलनी, झुलेलाल नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून तब्बल २ लाख ४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना २४ जानेवारीच्या मध्यरात्री ते २५ जानेवारीच्या सकाळदरम्यान घडली आहे.
याप्रकरणी रवि राजूमलहोतबानी (रा. सिंधी कॉलनी, झुलेलाल नगर, खामगाव) यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांचे काका गेल्या तीन वर्षांपासून पुणे येथे वास्तव्यास असून खामगाव येथील त्यांचे घर बंद अवस्थेत आहे. सदर घराशेजारीच तक्रारदारांचे घर आहे.
२४ जानेवारीच्या रात्री तक्रारदारांनी काकांचे घर पाहिले असता घराचे कुलूप सुस्थितीत असल्याचे दिसून आले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी पाहणी केली असता घराचे कुलूप तुटलेले व दरवाजा उघडा असल्याचे आढळून आले. घरात प्रवेश करून पाहिले असता अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे निष्पन्न झाले.

चोरट्यांनी जुने सोन्याचे कंगन (५० ग्रॅम) २ नग, सोन्याची कंगणे (३० ग्रॅम) ४ नग, सोन्याच्या अंगठ्या (३० ग्रॅम) ६ नग, सोन्याची चैन (२० ग्रॅम), नेकलेस (२० ग्रॅम), एक वर्षापूर्वी खरेदी केलेली सोन्याची चैन (१० ग्रॅम) व मंगळसूत्र (१० ग्रॅम) असा एकूण सुमारे २०० ग्रॅम वजनाचा सोन्याचा ऐवज लंपास केला आहे. या दागिन्यांची एकूण किंमत अंदाजे २ लाख ४ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (अ), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पांटे हे करीत आहेत.