डोणगावात घरफोडी; सेवानिवृत्त शिक्षकांचे तीस हजार रुपये व सोन्याची अंगठी लंपास!

 
 डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : येथील सपनाताई सावजी नगर येथे चोरट्यांनी एका सेवानिवृत्त शिक्षकांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केली. या घटनेत चोरट्यांनी तीस हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्याची अंगठी लंपास केल्याचा प्रकार ११ ऑक्टोबरच्या सायंकाळी उघडकीस आला.
मिळालेल्या माहितीनुसार, सपनाताई सावजी नगरमधील राज्य महामार्गालगत राहणारे सेवानिवृत्त शिक्षक डिंगाबर सवडदकर हे ७ ऑक्टोबर रोजी कुटुंबासह तीर्थयात्रेसाठी बाहेरगावी गेले होते. ११ ऑक्टोबरच्या सायंकाळी त्यांच्या घरात राहणाऱ्या भाडेकरूने घरी गेल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले आणि कपाटे उघडून घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळले.
भाडेकरूने तात्काळ सवडदकर यांना घटनेची माहिती दिली. सवडदकर यांनी फोनद्वारे पोलिसांना कळविले. माहिती मिळताच ठाणेदार अमरनाथ नागरे आणि त्यांचे सहकारी पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
डिंगाबर सवडदकर यांनी पोलिसांशी संपर्क साधून सांगितले की, कपाटातील साडीत ठेवलेली तीस हजार रुपये रोख रक्कम आणि एक सोन्याची अंगठी चोरीला गेली आहे.
सवडदकर हे अद्याप बाहेरगावी असल्याने वृत्त लिहेस्तोवर या संदर्भात पोलिस ठाण्यात औपचारिक फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.