बुलढाणा शहरात घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू...
Feb 14, 2026, 11:26 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील गजानननगर, क्रीडा संकुल रोड परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व दागिने असा एकूण सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राम गजानन सोळंके (वय ३०, रा. बुलढाणा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते कुटुंबासह गजानननगर येथे वास्तव्यास आहेत. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी त्यांनी घराला कुलूप लावले होते. त्यांची पत्नी माहेरी भालगाव येथे गेली होती, तर ते रुग्णालयीन कामानिमित्त पुणे येथे गेले होते.
११ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ते घरी परतले असता घराचे कुलूप तुटलेले आढळले.
घरात प्रवेश केल्यानंतर कपाटातील लॉकर फोडून सामान अस्ताव्यस्त टाकलेले दिसून आले. कपाटातील ७५ हजार रुपये रोख रक्कम तसेच चांदीचे कडे, पैंजण, बाळाचे दागिने आणि कानातील दागिने असा सुमारे ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. एकूण अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, सायंकाळच्या सुमारास घराला कुलूप लागलेले असल्याचे शेजाऱ्यांनी पाहिल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे करीत आहेत. शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.