देऊळगाव राजात दिवसाढवळ्या घरफोडी; घराचे कुलूप फोडून २.३६ लाखांचा ऐवज लंपास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतनगर येथील रहिवासी अविनाश विष्णू झोरे यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. सोमवारी (दि. २७) सकाळी ११ ते दुपारी १.३० या कालावधीत खोरेश्वर मंदिर परिसरातील त्यांच्या घरात ही चोरी झाली. घरातील महिला शाळेत कर्तव्यावर गेल्याची संधी साधत चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप आणि कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
यानंतर चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर फोडून त्यामधील ₹१ लाख ४० हजारांची रोकड, प्रत्येकी सुमारे पाच ग्रॅम वजनाचे दोन जोड सोन्याचे झुमके, इतर सोन्याचे दागिने तसेच लहान मुलांचे चांदीचे दागिने असा एकूण ₹२.३६ लाखांचा ऐवज चोरून नेला.
घटनेची माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घरफोडीमुळे शिवाजीनगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.