दाभाडी येथे दोन घरांवर चोरट्याचा डल्ला; १.३० लाखांचा ऐवज लंपास

 

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोताळा तालुक्यातील दाभाडी गावात अज्ञात चोरट्याने दोन घरांमध्ये डल्ला मारत सुमारे १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी १८ मे रोजी रात्री सुमारास घडली.

 

हेही वाचा...

मोताळ्यात आगीचे रौद्ररूप; आठवडी बाजारातील दुकानांना....

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाभाडी येथील शेतकरी किशोर पंढरी तळोले आपल्या कुटुंबासह अंगणात झोपले होते. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मागील दरवाजाची कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सुमारे ५० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेण्यात आली.

ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात चर्चा रंगली असता, शेजारी राहणारे विष्णू पांडुरंग टेकाळे यांच्या घरातही चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या घरातील कपाटातून सुमारे २२ ग्रॅम वजनाची, अंदाजे ८० हजार रुपयांची सोन्याची चैन चोरीस गेल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
या प्रकरणी मोताळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.