BREAKING मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी बुलडाणा LCB ची मोठी कारवाई! दोन पिस्टल,६ काडतुसे जप्त

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा, सण उत्सवांचा काळ यामुळे बुलडाणा पोलीस अलर्ट मोडवर आहेत.तशा सूचना जिल्हा पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत.

आज,१९ सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलडाण्यात येत आहेत त्याआधी अशोक लांडेंच्या नेतृत्वातील बुलडाणा LCB ने मोठी कारवाई केली असून देशी बनावटीच्या दोन पिस्टल आणि ६ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. एका आरोपीला याप्रकरणात अटक केली आहे.

 
Advt
Advt.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इरफान लतीफ पटेल(२०, रा. पातूर्डा, ता.संग्रामपूर ) असे आहे. संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलीस स्टेशन हद्दीतील शिवनी ते करमोडा रोडवर दयालनगर शिवारात ही कारवाई करण्यात आली.
Advt
Advt.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपी इरफान च्या ताब्यातून ८० हजार रुपये किंमतीच्या२ देशी पिस्टल, ६ हजार रुपये किंमतीची जिवंत काडतुसे आणि एक ड्रीम युगा कंपनीची मोटरसायकल असा १ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीची चौकशी करण्यात येत असून बनावट देशी पिस्टल वापरणाऱ्या आणखी काहींचा शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक नेमण्यात आले आहे. 
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी महामुनी ( बुलडाणा) आणि अशोक थोरात ( खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशाने सपोनि आशिष चेचरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन काकडे, पोहेकॉ दिपक लेकुरवाळे, एजाज रफिक खान, पोकॉ. अजीज परसुवाले, विक्रांत इंगळे , समाधान टेकाळे यांनी केली.