बुलडाणा LCB सुसाट! १८ तासांच्या आत आवळल्या अट्टल चोरट्यांच्या मुसक्या...
बुलढाणा शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बुलढाणा अर्बन रेसिडेन्सीच्या पार्कीगमध्ये अल्ट्राटेक इंजिनियरने एमएच-२९-एआर-२६८२ क्रमांकाची चारचाकी गाडी पार्क केलेली होती. अज्ञात चोरट्याने सदर गाडीच्या काचा फोडून गाडीतील लॅपटॉप व सॅमसंग कंपनीचा मोबाईल (दोन्ही किंमती ३० हजार रुपये) असा मुद्देमाल चोरुनपोबारा केला होता. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुध्द भारतीय न्याय संहिताच्या कलम ३०३ (२), ३२४ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी उपरोक्त गुन्ह्याच्या समांतर तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांना दिले होते. लांडे यांनी त्यांच्या अधीनस्त असलेल्या पोउपनि सचिन कानडे, पोलीस अंमलदार दिपक लेकुरवाळे, चांद शेख व महिला पोलीस अंमलदार आशा मोरे यांचे पथक गठीत करुन उपरोक्त आरोपीचा शोध घेऊन, त्याला अटक करुन मुद्देमाल जप्त करण्याच्या सुचना दिल्या. पथकाने गोपनीय माहिती काढून आरोपी शेख अरबाज शेख महमूद (वय २२ वर्षे) रा. इक्बाल नगर, बुलडाणा याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने उपरोक्त गुन्ह्यासह अन्य दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली.