बुलडाणा सायबर पोलीसांची मोठी कामगिरी; ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक प्रकरणातील १० लाखांपैकी ९.९४लाख रुपये परत...
तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी तातडीने संबंधित बँकांना पत्रव्यवहार करून आरोपींच्या खात्यांची तांत्रिक तपासणी सुरू केली. फसवणूक केलेले पैसे विविध खात्यांत वळविण्यात आले असल्याचे समोर आले. तपास पथकाने त्वरित ही सर्व खाती गोठविण्याची (Freeze) प्रक्रिया केली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींनी वळवलेली तक्रारदारांची रक्कम मिझोरम राज्यातील एका बँक खात्यात गेल्याचे निदर्शनास आले. तत्काळ कारवाई करत त्या खात्यातील तब्बल 9 लाख 94 हजार 300 रुपये रक्कम गोठवून न्यायालयाच्या आदेशानुसार ती तक्रारदारांच्या बँक खात्यात दि. 12 नोव्हेंबर 2025 रोजी यशस्वीरित्या परत मिळवून देण्यात आली.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश सदगर, तपास अधिकारी पो. नि. संग्राम पाटील, सपोनि प्रमोद इंगळे, पोहेकॉ रामेश्वर मुंढे, प्रशांत गावंडे, राहुल इंगळे आणि केशव पुढे यांच्या पथकाने केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे नागरिकांना आवाहन
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी आवाहन केले की, "डिजीटल अरेस्ट" असा स्वरुपाचा कोणताही प्रकार नसतो. पोलीस किंवा कोणतेही डिपार्टमेंट व्हॉट्सअॅपव्दारे कॉल किंवा व्हिडीओ कॉल करुन आपणास अटक करत नाही. त्यामुळे अनोळखी नंबरवरुन येणारे व्हॉट्सअॅप कॉल किंवा व्हिडीओ कॉल आल्यास नागरिकांनी त्यास प्रतिसाद देवू नये. तसेच ऑनलाईन आर्थिक फसवणुक झाल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक 1930 किंवा 1945 या क्रमांकावर किंवा cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार नोंदवावी. तसेच शक्य असल्यास तात्काळ नजीकचे पोलीस स्टेशन अथवा सायबर पोलीस स्टेशन, बुलढाणा येथे संपर्क साधावा.
