Buldana Hit & run Case… आरोपीच्‍या मेव्‍हणीची पोलीस महिलेला धमकी… तुझी वर्दी उतरवते..!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दारूच्या नशेत कार चालवून एकाच्या मृत्यूस आणि 2 पोलीस कर्मचारी व एका दाम्पत्याच्या जखमी होण्यास कारणीभूत ठरलेल्या आरोपीच्या मेव्हणीने काल, 10 मे रोजी जिल्हा रुग्णालयात पोलीस कर्मचारी महिलेला धमक्या दिल्याचे समोर आले आहे. तुला पोलीस खात्यातून कमी केल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी दिल्याची तक्रार पोलीस कर्मचारी योगिता शेळके यांनी केल्यावरून …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दारूच्‍या नशेत कार चालवून एकाच्‍या मृत्‍यूस आणि 2 पोलीस कर्मचारी व एका दाम्‍पत्‍याच्‍या जखमी होण्यास कारणीभूत ठरलेल्या आरोपीच्‍या मेव्‍हणीने काल, 10 मे रोजी जिल्हा रुग्‍णालयात पोलीस कर्मचारी महिलेला धमक्‍या दिल्याचे समोर आले आहे. तुला पोलीस खात्‍यातून कमी केल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी दिल्याची तक्रार पोलीस कर्मचारी योगिता शेळके यांनी केल्यावरून आरती भारत साबळे (35, रा. बुलडाणा) हिच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

काल 9 मेच्‍या दुपारी साडेचारच्‍या सुमारास जयस्‍तंभ चौकातून भरधाव आलेल्या कारने (क्रमांक एमएच 28 एजे 2632) बुलडाणा शहर पोलीस ठाण्यासमोर मधुकर शंकर जाधव (60, रा. शांतीनिकेतन नगर, सुंदरखेड परिसर बुलडाणा) यांना चिरडून महिला पोलीस कर्मचारी योगिता शेळके, पोलीस कर्मचारी अमोल खराडे आणि विशाल तांगडे व कोमल तांगडे या दाम्‍पत्‍याला उडवले होते. या हे चौघेही जखमी झाले होते. यावेळी संतप्‍त नागरिकांनी चालक शशिकांत अशोक गवई (35, रा. सम्यकनगर, सुंदरखेड, बुलडाणा) या तरुणाला कारमधून बाहेर काढले. तो दारूच्‍या नशेत तर्रर्र असल्याचे पाहून नागरिकांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली होती. पोलिसांनी धावून त्‍याला नागरिकांच्‍या तावडीतून सोडवत वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्‍णालयात नेले होते. या ठिकाणी अपघातातील जखमीही उपचारासाठी आले होते. त्‍यावेळी आरोपी शशिकांत गवईची मेव्‍हणी आरती साबळे हिने योगिता शेळके यांना अश्लील भाषेत शिविगाळ करत पोलीस खात्‍यातून तुला कमी केल्याशिवाय राहणार नाही. तुला पाहून घेईल, अशी धमकी दिली. तपास पोहेकाँ कैलास जाधव करत आहेत.

रात्री उशिरा कारचालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल

दारूच्‍या नशेत भरधाव कार चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या शशिकांत गवईविरुद्ध बुलडाणा शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्‍हे दाखल केले आहेत.