जागा नावावर करून देण्यासाठी मागितली लाच;२० हजारांची लाच घेताना ग्रामसेवकास रंगेहात अटक; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई...
Updated: Nov 7, 2025, 19:08 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गावाच्या ८-अ नोंद व उतारा देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक राजेंद्र भास्कर वास्कर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई आज, दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी बुलडाणा तहसील कार्यालयाच्या आवारात करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराच्या मयत बहिणी आणि भाऊ यांच्या ग्राम नाईकनगर ग्रामपंचायत, दाभा येथील दोन जागा तक्रारदार यांच्या मुलांच्या नावाने करून ८-अ नोंदी व उतारे देण्यासाठी ग्रामसेवक राजेंद्र वास्कर यांनी एकूण २८ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी पुढे बोलणी होऊन २० हजार रुपयांवर व्यवहार ठरल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणाकडे तक्रार नोंदविली.
त्यानुसार पडताळणी करण्यात आली असता वास्कर यांनी लाच मागणीची खात्री पटल्याने आज सापळा रचण्यात आला. त्यात ग्रामसेवक राजेंद्र वास्कर यांनी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच त्यांना पथकाने रंगेहात पकडले.
ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो बुलढाणाचे पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी रमेश पवार, विलास गुसिंगे, श्याम भांगे,प्रवीण बैरागी, राजेंद्र शिरसागर,अमोल झिने,जगदीश पवार, रंजित व्यवहारे,शैलेश सोनवणे,लक्ष्मीकांत इंगळे,नितीन शेटे,स्वाती वणी यांच्या पथकाने केली.
